चिखली (हॅलो बुलडाणा/ सय्यद साहिल) देशाच्या रक्षणासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या वीर शहिदांच्या स्मृतींना विसरणे म्हणजे राष्ट्रद्रोहच असा ठाम संदेश देत चिखली तालुका पत्रकार संघाने प्रजासत्ताक दिनी अनोखा व प्रेरणादायी उपक्रम राबवला. “शहीदो की चिताओ पर हर बरस लगेंगे मेले…” या ओळींचा अर्थ कृतीत उतरवत पत्रकार संघाच्या सदस्यांनी शहरातील शहिद स्मारकांना भेट देत वीर जवानांना मानवंदना दिली.
शेलुद येथील शहीद दिलीप हरीभाऊ जाधव, मलकापूर-सोलापूर महामार्गावरील वीर जवान कैलास भारत पवार तसेच सिद्धार्थ नगरमधील शहीद विजय लक्ष्मण भिसे यांच्या स्मृतिस्थळांवर पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. अध्यक्ष नितीन फुलझाडे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या उपक्रमातून देशभक्ती केवळ भाषणापुरती नसून कृतीतून व्यक्त व्हावी, हा ठाम संदेश देण्यात आला. पत्रकार संघाने शहिदांच्या बलिदानाला नमन करत समाजाला जागृत राहण्याचे आवाहन केले.












