हातनी (हॅलो बुलडाणा/ सय्यद साहिल) “मंत्री” नावाचा काका रक्ताचा तहानलेला निघाला! एकाच घरात राहणाऱ्या काका-पुतण्यात किरकोळ वादातून थेट हत्या झाली आणि अवघं गाव हादरून गेलं. हातनी ता. चिखली येथे काल रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास काकानेच पुतण्याचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली.
मृतक गोपाल अजबराव जाधव (वय २४, रा. हातनी) हा स्वतःच्या राहत्या घरात असताना काका विनोद रामचंद्र जाधव उर्फ मंत्री याच्याशी किरकोळ कारणावरून वाद झाला. क्षणातच हा वाद हिंसक झाला आणि संतापाच्या भरात काकाने कुऱ्हाडीच्या मागच्या भागाने गोपालच्या डोक्यावर व छातीत जोरदार वार केले. रक्ताच्या थारोळ्यात गोपाल जागीच ठार झाला. घरातच घडलेल्या या क्रूर हत्येने परिसरात भीतीचं वातावरण पसरलं.
घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी तात्काळ चिखली पोलिसांना कळवलं. मात्र, पोलिस येत असल्याची खबर आरोपी मंत्री याला लागताच तो अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून फरार झाला. अंधारात तो मक्याच्या शेतात लपून बसल्याचं समोर आलं. चिखली पोलिसांनी कसून शोध मोहीम राबवत अवघ्या दोन तासांत आरोपीला शेतातून ताब्यात घेतलं.
ही धडक करावाई जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनात चिखली पोलीस स्टेशनचे ठाणेदार भूषण गावंडे, पोलीस उपनिरीक्षक शरद भागवतकर, उपनिरीक्षक नितीनसिंग चव्हाण, विजय किटे बिट जमदार अनिल वाघ, डी बी पथक अमोल गवई, प्रशांत धंदर, राहुल पायघन, अजय इटावा, अमोल इंगळे यांनी केली. आरोपीला अटक करण्यात आले असून पुढील तपास सुरु आहे










