spot_img
spot_img

‘लाडक्या बहिणी’च्या न्यायासाठी खाकी मैदानात; साखरखेर्डा पोलिसांची तत्काळ कारवाई, एसपी तांबे यांची दखल!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) राज्यभर ‘लाडकी बहीण’ योजनेच्या घोषणा दिल्या जात असताना, साखरखेर्डा पोलीस स्टेशन हद्दीतील एका विवाहित महिलेच्या छळप्रकरणाने खळबळ उडवली होती. सुरुवातीला केवळ एन.सी. दाखल झाल्याने पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. मात्र हॅलो बुलढाणा च्या ठाम पाठपुराव्यानंतर आणि जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी तात्काळ दखल घेतल्याने प्रकरणाला वेगळीच दिशा मिळाली आहे.

पीडित महिलेने पती उमेश खरडे यांच्याविरोधात मानसिक छळ, धमक्या, सायबर अत्याचार, बदनामी आणि मोबाईल हॅकिंगसारखे गंभीर आरोप केले होते. शासकीय पदाचा गैरवापर करून संपूर्ण कुटुंबाला त्रास दिला जात असल्याचा आरोपही तक्रारीत होता. हा प्रकार हलक्यात घेण्याजोगा नसताना, हॅलो बुलढाणा ने हा मुद्दा आक्रमकपणे मांडत प्रशासनाचे लक्ष वेधले.

यानंतर कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी त्वरित आवश्यक त्या कारवाईचे स्पष्ट निर्देश दिले. त्याचे सकारात्मक परिणाम दिसून आले असून, कर्तव्य बजावणारे साखरखेर्डा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गजानन करेवाड यांनी स्वतः पुढाकार घेत पीडितेला न्याय देण्यासाठी कारवाई सुरू केली आहे. “पीडितांनी तक्रार देऊन सर्व पुरावे रीतसर सादर करावेत. त्याआधारे सखोल चौकशी करून पुढील कडक कारवाई केली जाईल,” असे ठाम आश्वासन पोलीस निरीक्षक करेवाड यांनी हॅलो बुलढाणा शी बोलताना दिले.

खाकी वर्दीतील या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांनी दाखवलेली तत्परता हीच पोलिसी व्यवस्थेची खरी ओळख आहे.एका बहिणीला न्याय देण्यासाठी एसपी कार्यालयापासून पोलीस ठाण्यापर्यंत यंत्रणा हालचालीत आली आहे. हॅलो बुलढाणा च्या आवाजाला मिळालेला हा न्याय, त्या पीडित बहिणीसह संपूर्ण कुटुंब कधीही विसरणार नाही.

अन्यायाविरुद्ध उभे राहणे हीच हॅलो बुलढाणा ची भूमिका आहे. महिलेला न्याय मिळेपर्यंत हा लढा सुरूच राहील आणि आज पोलिसांनी दाखवलेली संवेदनशीलता नक्कीच विश्वास वाढवणारी आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!