चिखली (हॅलो बुलडाणा/ सय्यद साहिल) जालना-खामगाव बायपासवरील अपघातांचे सत्र काही केल्या थांबत नसून आज पुन्हा एक भीषण अपघात घडला आहे. काजी ले-आउट कमानीसमोर दुचाकीचा तोल सुटून थेट दुभाजकावर आदळल्याने विजय दांडगे (वय ५०, रा. कोणड बुद्रुक, ता. जाफ्राबाद, जि. जालना) हे गंभीर जखमी झाले आहेत. काल संध्याकाळी सुमारे ७ वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
विजय दांडगे हे आपल्या मुलीला भेटण्यासाठी कोणड येथून दिवठाणा येथे गेले होते. दिवठाणा येथून परत आपल्या गावी जात असताना चिखली शहरालगत असलेल्या जालना–खामगाव बायपासवर अचानक त्यांच्या दुचाकीचा तोल सुटला. क्षणार्धात दुचाकी रस्त्याच्या मधोमध असलेल्या दुभाजकावर जोरात आदळली. या धडकेत दांडगे गंभीर जखमी झाले असून रस्त्यावर रक्ताचा सडा पडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
अपघातानंतर तातडीने त्यांना डॉ. राऊत यांच्या दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी त्यांना तात्काळ संभाजीनगर येथे रेफर केले आहे.विशेष म्हणजे, हा बायपास अपघातांचा हॉटस्पॉट ठरत असून वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.










