धाड (हॅलो बुलडाणा) केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी NDLM (National Digital Livestock Mission) योजना बुलढाणा जिल्ह्यात जनावरांच्या आरोग्यासाठी नव्हे, तर थेट भ्रष्टाचारासाठी वापरली जात असल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. देऊळघाट, पाडळी, हतेडी, रायपूर व धाड परिसरात प्रत्यक्ष लसीकरण न करता केवळ पोर्टलवर बनावट नोंदी करून शासनाच्या कोट्यवधी रुपयांवर सुनियोजित ‘डिजिटल दरोडा’ टाकण्यात आल्याचे ठोस पुरावे समोर येत आहेत.
रायपूर परिसरात तर पोर्टलने विज्ञानालाही लाजवेल असा प्रकार केला आहे. १० ते १२ वर्षांपूर्वी मृत्यू पावलेली जनावरे २०२५ मध्ये जिवंत दाखवून त्यांचे यशस्वी लसीकरण झाल्याची नोंद आहे. मृत जनावरांच्या नावावर लसी दाखवून निधी लाटणे म्हणजे थेट फसवणूकच नव्हे तर सरकारी तिजोरीवर डल्ला आहे.
धाड येथील पशुवैद्यकीय दवाखाना तब्बल तीन वर्षांपासून कुलूपबंद असताना, पोर्टलवर मात्र हजारो लसीकरणे झाल्याची नोंद आहे. डॉक्टर नाहीत, कर्मचारी नाहीत, मग लसीकरण कोणी केले? पगार कोणासाठी उचलला जातोय?
देऊळघाट परिसरात एका संशयास्पद युजरने नियम मोडून एकाच बॅचमधून २८०० नोंदी केल्याचे समोर आले आहे. इतके ठोस डिजिटल पुरावे असूनही FIR नाही, चौकशी नाही. हे प्रशासनाचे मौन नेमके काय दर्शवते? मौन म्हणजे सहभाग तर नाही ना? दोषींवर तात्काळ कारवाई झाली नाही तर हा आवाज अधिक तीव्र होईल, असा इशारा देण्यात आला आहे.











