चिखली (हॅलो बुलडाणा/ सय्यद साहिल) खामगाव रोडवरील शेलूद फाट्याजवळ काल संध्याकाळी सुमारे 5 वाजेच्या सुमारास भीषण अपघात घडला. भरधाव चारचाकी वाहनाने नियंत्रण सुटल्याने तब्बल 4 ते 5 पलटे घेत रस्त्याच्या कडेला धडक दिली. या भीषण अपघातात रितेश समाधान लहाने (वय 17, रा. काटोळा ता. चिखली) याचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.
अपघातग्रस्त वाहनाचा क्रमांक GJ 05 CQ 4796 असून अपघाताची तीव्रता इतकी होती की वाहन अक्षरशः चक्काचूर झाले. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.
मृतक रितेश लहाने याचा मृतदेह उपजिल्हा रुग्णालय, चिखली येथे शवविच्छेदनासाठी आणण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार भूषण गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हुसे व हवालदार कैलास चतरकर करीत आहेत.











