बुलढाणा (हॅलो बुलडाणा) तालुक्यातील कोलवड फाटा परिसरात गुन्हेगारी वृत्तीने केलेल्या निर्घृण हल्ल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. रस्त्यावर उभी असलेली गाडी बाजूला काढण्यास सांगितल्याच्या किरकोळ कारणावरून दोघा आरोपींनी लोखंडी फायटरने जीवघेणा हल्ला केल्याची घटना ६ जानेवारीच्या रात्री घडली. या हल्ल्यात बुलढाणा तालुक्यात राजकीय व सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेले निलेश संतोषराव पाटील (वय ४५, रा. कोलवड) गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर बुलढाणा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, निलेश पाटील हे ६ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास एमएच-२८-बीव्ही-२४७५ क्रमांकाच्या स्कुटीने दैनंदिन कामे आटोपून घरी परतत होते. कोलवड बसस्टँड चौकात पोहोचताच एका काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडी रस्त्याच्या मदत उभी होती. त्यामुळे पाटील यांनी गाडी बाजूला घेण्यास सांगितले असता आदेश राठोड आणि सुरज पसरटे (दोघेही रा. बुलढाणा) यांनी उद्धटपणे नकार दिला. क्षणातच आरोपींनी लोखंडी फायटर काढत पाटील यांच्या डोक्यावर, नाकावर व तोंडावर सपासप वार केले.
रक्तबंबाळ होऊन पाटील जमिनीवर कोसळल्यानंतरही आरोपींचा हिंसाचार थांबला नाही. लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत जीवे मारण्याची धमकी व शिवीगाळ करण्यात आली. हा थरार पाहून ऋत्विक दसरकर, नितीन सपकाळ व श्रावण बिबे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र नागरिक जमा होत असल्याचे लक्षात येताच आरोपी स्कॉर्पिओतून घटनास्थळावरून पसार झाले.
जखमी पाटील यांना तातडीने विनोद जाधव यांच्या रिक्षातून रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी बुलढाणा शहर पोलिसांनी आदेश राठोड व सुरज पसरटे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास ठाणेदार रवी राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पो. नि. युवराज रबडे करीत आहेत.











