spot_img
spot_img

मुलगी जन्माला आली म्हणून मृत्यूची शिक्षा? लोणार तालुक्यात काळीज पिळवटून टाकणारी घटना!

लोणार (हॅलो बुलडाणा) तालुक्यातील वढव गावात माणुसकीला काळीमा फासणारी आणि समाजाला हादरवून सोडणारी हृदयद्रावक घटना घडली आहे. पोटच्या मुलींना जन्म दिला, पण वंशाला दिवा दिला नाही या मानसिकतेतून होणाऱ्या छळाने एका २५ वर्षीय विवाहितेचा बळी घेतला. घरगुती वाद आणि सातत्याच्या मानसिक त्रासाला कंटाळून कांचन अमोल सोनुने हिने टोकाचे पाऊल उचलत आपल्या दोन चिमुकल्या मुलींना फासावर लटकवून स्वतःही आत्महत्या केली. मात्र नियतीने वेगळाच खेळ केला.गळफास तुटल्याने दोन्ही मुली खाली कोसळल्या आणि त्यांच्या जीवावर बेतलेला प्रसंग थोडक्यात टळला.

कांचनची तीन वर्षांची आकांक्षा आणि अवघ्या सहा महिन्यांची प्रांजल या निष्पाप जिवांना आईनेच मृत्यूच्या दारात ढकलले, ही बाब अंगावर काटा आणणारी आहे. घरातील अँगलला तिघींना लटकवल्यानंतर काही वेळातच मुलींच्या कर्कश रडण्याचा आवाज गावकऱ्यांच्या कानावर पडला. संशय येताच ग्रामस्थांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. दृश्य भयावह होते.कांचन गळफास घेतलेल्या अवस्थेत मृत पडली होती, तर दोन्ही मुली खाली पडलेल्या, गळ्यावर फासाचे वळ स्पष्ट दिसत होते.

ग्रामस्थांनी तत्काळ मुलींना रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. डॉक्टरांच्या माहितीनुसार दोन्ही मुलींची प्रकृती सध्या स्थिर आहे. मात्र एका चुकीच्या सामाजिक रूढीने, पुरुषसत्ताक मानसिकतेने आणि मुलगा हवा या विकृत अपेक्षेने एका तरुण विवाहितेचा जीव गेला.

या घटनेने पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केला आहे.आजही मुलींना जन्म देणे गुन्हा ठरतोय का? वंशाला दिवा नसल्याने छळ करणे कितपत योग्य? पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली असून सखोल तपास सुरू आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!