spot_img
spot_img

पती जळून मृत्यू प्रकरणात मोठा ट्विस्ट! पत्नी पोलीस शिपायाला जामीन – न्यायालयाने दाखवली पुराव्यांची पोलखोल

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) बुलढाण्यात खळबळ उडवणाऱ्या आणि नातेसंबंध, सत्य व न्याय यांवर गंभीर प्रश्न उपस्थित करणाऱ्या प्रकरणात सत्र न्यायालयाने शुक्रवारी लता रंधीर गवई या महिला पोलीस शिपायाला नियमित जामीन मंजूर केला. पतीला पेट्रोल ओतून जाळल्याचा आरोप तिच्यावर असून, या घटनेत लष्करात कार्यरत असलेले पती रंधीर हिम्मत गवई यांचा मृत्यू झाला होता. ही घटना १३ जानेवारी २०२५ रोजी पहाटे तार कॉलनी, सुंदरखेड येथे घडली. पत्नीच्या घराबाहेर पती गंभीर भाजल्याच्या अवस्थेत आढळलेला पती रंधीर गवई यांचा उपचारादरम्यान सुमारे ९० टक्के भाजल्याने मृत्यू झाला आहे.

रंधीर गवई यांनी मृत्यूपूर्व जबाबात (डायिंग डिक्लरेशन) असे सांगितले की, पत्नीने वादानंतर अंगावर पेट्रोल ओतून काडी लावल्याचा आरोप केला होता. या जबाबावरून सुरुवातीला खुनाचा प्रयत्न असा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, मृत्यूनंतर भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम १०३ (१) अन्वये खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला.

मात्र, जामिनाच्या सुनावणीदरम्यान बचाव पक्षाचे विधिज्ञ अॅड. अजय दिनोदे यांनी पूर्णपणे वेगळे चित्र मांडले.

शेजारी व प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांसह आरोपीची मुलगी यांचे जबाब तपासात नोंदवण्यात आले असून, मृत व्यक्ती दारूच्या नशेत स्वतः पेट्रोल घेऊन मध्यरात्री घराबाहेर आरडाओरड करत होता, असा दावा करण्यात आला.

न्यायालयाने मृत्यूपूर्व जबाब मृताच्या जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत नोंदवण्यात आल्याबाबतही गंभीर दखल घेतली असून, त्यामुळे त्या जबाबाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. विशेष म्हणजे आरोपीच्या घरातून कोणतेही दोषारोपण करणारे साहित्य जप्त करण्यात आलेले नाही.

प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जबाब आणि मृत्यूपूर्व जबाब यांत स्पष्ट विसंगती दिसून येत असल्याचे नमूद करत सत्र न्यायाधीश यांनी केवळ आरोप गंभीर आहेत म्हणून जामीन नाकारणे योग्य ठरणार नाही, असे निरीक्षण नोंदवले. त्यामुळे कठोर अटींसह जामीन मंजूर करण्यात आला.

आरोपीचे विधीज्ञ अॅड, अजय दिनोदे यांना आरोपीची बाजू मांडण्याकरिता अॅड. जुहेर शेख, अॅड. अबूजर अन्सारी, अॅड. रोहित दिनोदे, अॅड. नितीन जाधव, अॅड. किशोर सुरोशे यांनी सहकार्य केले.न्यायालयीन दारातून तिची सुटका झाली असली, तरी या प्रकरणाचा अंतिम निर्णय अद्याप बाकी आहे. आता या घटनेचे सत्य न्यायालयीन सुनावणीत पुरावे आणि साक्षींच्या आधारे उलगडणार आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!