spot_img
spot_img

अवैध वाळू माफियांवर कारवाई मागितली म्हणून तलाठ्याकडून पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी! – नांदुरात खळबळजनक प्रकार

नांदुरा (हॅलो बुलडाणा) लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारितेचा आवाज दाबण्याचा संतापजनक प्रयत्न नांदुरा तालुक्यात समोर आला आहे. ग्राम केदार येथील रहिवासी व साप्ताहिक विदर्भ टायगर या वृत्तपत्राचे संपादक किशोर इंगळे यांनी अवैध गौण खनिज उत्खननाविरोधात आवाज उठविल्याने स्थानिक तलाठीने थेट जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप झाला आहे.

नांदुरा तालुक्यातील नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वाळू उपसा सुरू असून, भरधाव टिपर गावातील रस्त्यांवरून धावत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या जीवघेण्या प्रकाराला आळा बसावा, यासाठी पत्रकार किशोर इंगळे यांनी तहसीलदारांकडे लेखी तक्रार केली. मात्र, ही तक्रार केल्यानंतर कायद्याचे रक्षण करणारा अधिकारीच कायदा हातात घेऊन धमकावू लागल्याचा धक्कादायक प्रकार घडला.

स्थानिक तलाठी नितीन म्हस्के यांनी “हा भाग माझ्या कार्यक्षेत्रात येतो, तुझ्या तक्रारीमुळे मला वरिष्ठांना जवाब द्यावा लागतो. तुला जास्त मस्ती आली आहे काय? रेतीच्या गाडीखाली चिरडून टाकीन,” अशी खुलेआम धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. इतकेच नव्हे, तर सदर तलाठीचे अवैध वाळू व्यावसायिकांशी आर्थिक संबंध असल्याचा गंभीर संशयही व्यक्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी किशोर इंगळे यांनी नांदुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, माझ्या जीवितास कोणतीही हानी झाल्यास अथवा हल्ला झाल्यास यास तलाठी नितीन म्हस्के सर्वस्वी जबाबदार राहतील, असे स्पष्ट नमूद केले आहे. विशेष म्हणजे, संबंधित तलाठी गेल्या ७–८ वर्षांपासून एकाच ठिकाणी कार्यरत असून, मुख्यालयी वास्तव्यास नसल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!