देऊळघाट (हॅलो बुलडाणा/ इम्रान खान) बस स्टँड परिसरात काल रात्री सुमारे ९.४० वाजण्याच्या सुमारास अचानक भीषण आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. काही मिनिटांतच आगीने उग्र रूप धारण करत तीन ते चार दुकाने पूर्णतः जळून खाक केली. आगीच्या भडिमारामुळे काळ्या धुराचे लोळ दूरवर पसरले, त्यामुळे प्रवासी, दुकानदार आणि नागरिकांमध्ये घबराट पसरली.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाची गाडी तातडीने घटनास्थळी दाखल झाली असून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र दुकानदारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. नुकसानग्रस्तांमध्ये मोहम्मद जहीर मोहम्मद सगीर अन्सारी यांचे दुकानही पूर्णपणे जळाले आहे.आगीची तीव्रता इतकी प्रचंड होती की विद्युत लाईनचे तार व खांबही जळून खाक झाले.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून महावितरणचे कर्मचारी एस. एल. वाघ, संतोष मांडवे व मोहम्मद खालील यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन वीजपुरवठा बंद केला. दरम्यान, पोलीस प्रशासन व अग्निशमन दलाच्या संयुक्त आणि अथक प्रयत्नांमुळे तब्बल दोन ते तीन तासांच्या संघर्षानंतर या भीषण आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.










