बुलडाणा (हॅलो बुलडाणा) चिखली दे. राजा तालुक्यातील महसूल कोमात असलेल्या जोमात खडकपूर्णा प्रकल्प परिसरात प्रचंड प्रमाणात बेकायदेशीर रेती उपसा सुरू आहे. दिवसा-रात्री ट्रॅक्टर, डंपर रांगा लागून रेती वाहतूक होत असल्याचे दृश्य आमच्या कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद होत आहे. मात्र, महसूल विभागाने लाखो रुपये खर्चून बसवलेले ‘अधिकृत सीसीटीव्ही कॅमेरे’ या रेतीमाफियांचे उद्योग का टिपत नाहीत, हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
कायदा सर्रास पायदळी तुडवत असताना महसूल प्रशासन गप्प का? कॅमेरे बंद आहेत की मुद्दाम अंध केले आहेत? की मग रेतीमाफियांना पाठीशी घालण्यासाठीच हे कॅमेरे शोपीस ठरले आहेत? खडकपूर्णा प्रकल्प परिसरात पर्यावरणाची सर्रास लूट सुरू असून नदीपात्र उद्ध्वस्त होत आहे. तरीही महसूल, तहसील आणि संबंधित अधिकारी ‘सबकुछ ठीक आहे’ अशा थाटात डोळेझाक करत असल्याचा संताप नागरिक व्यक्त करत आहेत.
जर आमच्या कॅमेऱ्यात रेती चोरी दिसते, तर सरकारी कॅमेऱ्यात ती का दिसत नाही? हा निव्वळ निष्काळजीपणा नसून संगनमताचा संशय बळावतो आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा महसूल यंत्रणेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह कायम राहील.










