spot_img
spot_img

💥EXCLUSIVE ‘आयुष्यमान भारत’च्या नावाखाली बुलढाण्यात धक्कादायक घोटाळा उघड!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) “नोकरी लावून देतो” या गोड शब्दांच्या जाळ्यात अडकवून एका सेवानिवृत्त नागरिकाची तब्बल १ लाख ५० हजार रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार बुलढाणा शहरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी अंकीत किरण मोहोड (रा. अकोला) याच्याविरुद्ध कलम 316(2), 318(4) BNS 2023 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी विलास हरीभाऊ मानवतकर (वय ६०, रा. सुंदरखेड, बुलढाणा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मार्च २०२४ मध्ये आरोपीने मोबाईलवर संपर्क साधत त्यांच्या मुलाला ‘आयुष्यमान भारत मिशन ऑर्गनायझेशन’ अंतर्गत आरोग्य सेवक पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले. विश्वास संपादन करून शैक्षणिक कागदपत्रे मागवण्यात आली आणि बनावट नियुक्तीपत्र देण्यात आले. त्याआधारे फिर्यादीकडून फोन-पे द्वारे टप्प्याटप्प्याने १,५०,००० रुपये उकळण्यात आले.

धक्कादायक म्हणजे, नियुक्तीपत्रानुसार मुलगा रुजू होण्यासाठी गेल्यावर ते पत्र पूर्णपणे बनावट असल्याचे स्पष्ट झाले. सत्य समोर येताच आरोपीने उडवाउडवीची उत्तरे देत पैसे परत देण्यास टाळाटाळ सुरू केली आणि अखेर फोन उचलणेही बंद केले. यानंतरही पोलिस ठाण्यात तक्रार घेण्यात विलंब झाल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.

या प्रकरणात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या परवानगीनंतर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे. ‘आयुष्यमान भारत’सारख्या राष्ट्रीय योजनेच्या नावाचा गैरवापर करून बेरोजगारांच्या आशांवर डल्ला मारणाऱ्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे, अशी तीव्र मागणी नागरिकांकडून होत आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!