बुलढाणा (हॅलो बुलडाणा) शहराच्या सर्कुलर रोडवरील बाहेकर कॉम्प्लेक्समधील एका ड्रायफ्रूट्स च्या दुकानाला अचानक आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. ही घटना आज अचानक घडली असून प्राथमिक माहितीनुसार शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचे समोर येत आहे. दुकानातून अचानक धूर आणि आगीच्या ज्वाळा उठू लागताच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.
घटनेची माहिती मिळताच बुलढाणा नगरपालिकेचे अग्निशामक दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी प्रसंगावधान राखत वेगाने कारवाई करत आग आटोक्यात आणली. त्यामुळे मोठी वित्तहानी आणि संभाव्य अनर्थ टळला. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही, मात्र दुकानातील मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सर्कुलर रोडसारख्या वर्दळीच्या ठिकाणी ही घटना घडल्याने काही काळ वाहतुकीवरही परिणाम झाला. नागरिकांनी सतर्कता दाखवत घटनास्थळापासून सुरक्षित अंतर ठेवले, त्यामुळे अग्निशामक दलाला काम करणे सोपे झाले.










