सिंदखेडराजा (हॅलो बुलडाणा/ बालाजी सोसे) सिंदखेडराजा तालुक्यातील शेतकरी अतिवृष्टी व ढगफुटी पावसामुळे प्रचंड संकटात सापडले आहेत. दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने पीक उद्ध्वस्त झाले असून शेतकरी हताश झाले आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी 24 सप्टेंबर रोजी किनगाव राजा महसूल मंडळातील सावखेड तेजन व पळसखेड चक्का परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतावर प्रत्यक्ष पाहणी केली.
या वेळी उपविभागीय अधिकारी खडसे, तहसीलदार दिवटे, कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच स्थानिक सरपंच, गावकरी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही. भरीव मदत मिळेल, मात्र शेतकऱ्यांनी ईपीक पेराची नोंद व फार्मर आयडी काढणे आवश्यक आहे.”
शेतकऱ्यांनी मात्र जिल्हाधिकाऱ्यांसमोर गंभीर प्रश्न उपस्थित केले. पिके सडून वास येत असल्याची, मदत अत्यल्प असल्याची, खर्च भागत नसल्याची हतबल व्यथा मांडली. पळसखेड चक्का येथील शेतकऱ्यांनी 26 फेब्रुवारी 2024 च्या अतिवृष्टीची मदत अद्याप मिळालेली नसल्याचे सांगत संताप व्यक्त केला. “तीन महिन्यांचे पीक असतानाही तीन बोंड नाहीत; शेतकरी जगायचं कसं?” असा संतप्त सवालही त्यांनी केला.
राज्य सरकारने नुकसानीच्या सर्वेक्षणात 90% नुकसान दाखवले असल्यास तितकाच पिक विमा मिळावा, विमा कंपन्यांना वेगळे निकष लावण्याचा अधिकार नसावा, अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना तातडीने मागील थकित मदत वितरित करण्याचे स्पष्ट निर्देश दिले.












