बुलढाणा (हॅलो बुलडाणा) एकेकाळी भाजपचे फायरब्रँड नेते म्हणून ओळखले जाणारे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आज अचानक बुलढाणा येथे धडक दिली असून, त्यांच्या या दौऱ्याने जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून माध्यमांपासून दूर असलेले सोमय्या पुन्हा एकदा आपल्या आक्रमक शैलीत सक्रिय झाले आहेत.
शासकीय विश्रामगृहावर आगमन झाल्यानंतर भाजपचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. मात्र, सोमय्या यांचा दौरा सौजन्यभेटीसाठी नसून, जिल्ह्यातील बांग्लादेशी घुसखोरी व बनावट मतदारांच्या मुद्द्यावरच आहे, हे स्पष्ट झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोमय्या हे आज जिल्हाधिकाऱ्यांसमवेत याच गंभीर विषयावर चर्चा करणार असून, प्रशासनाला ठोस कार्यवाहीसाठी सज्ज करणारी भूमिका घेणार आहेत.महाविकास आघाडी सरकारच्या काळात भ्रष्टाचार प्रकरणांच्या पाठपुराव्यामुळे सतत चर्चेत असलेले सोमय्या यांनी यापूर्वीही बुलढाणा जिल्ह्याला भेट दिली होती. मात्र आता बोगस मतदार आणि देशविरोधी घुसखोरीसारख्या मुद्द्यावर त्यांचा पुन्हा उद्रेक होत असल्याचे संकेत आहेत. जिल्ह्यातील काही मतदार यादींमध्ये संशयास्पद नावांचा समावेश असल्याचे भाजपचे निरीक्षण असून, यावरून सोमय्या प्रशासनाला जाब विचारणार आहेत.दुपारी पत्रकार परिषदेत सोमय्या काय भडिमार करणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे!




Total Users : 3596066