मेहकर (हॅलो बुलडाणा) सरकारी स्वस्त धान्य दुकाना मार्फत वितरीत करण्यात येणारे धान्य निकृष्ट दर्जाचे आहे. धान्यात रेती व माती मिश्रित बारीक खडे व धूळ असल्याचा आरोप करीत अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे मेहकर तालुकाध्यक्ष विजय माने यांनी उच्च दर्जाचे धान्य पुरविण्याची मागणी १७ जून रोजी तहसीलदार यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे.
सरकारी स्वस्त धान्य दुकाना मार्फत वितरीत करण्यात येणारा गहू हा निकृष्ट दर्जाचा असून गव्हात रेती व माती मिश्रित बारीक खडे व धूळ असल्याचा आरोप होतोय. हे गहू खाण्यालायक नाहीत. निकृष्ट दर्जाचे धान्य वाटप करुन शासन एक प्रकारे जनतेच्या आरोग्याशी खेळत आहे.असे निकृष्ट दर्जाचे गहू खाल्ल्यास नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतील. तसेच पोटदुखीच्या समस्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शासनाकडून स्वस्त धान्य दुकानांना धान्य पुरवठा करतांना गुणवत्ता निरिक्षकाकडून तपासणी करतांना विशेष काळजी घ्यावी,शासन यावेळी माहे जून, जुलै, ऑगस्ट, तीन महिन्याचे एकत्र धान्य वाटप करण्याच्या विचाराधिन आहे.किमान पुढील वाटपासाठी अन्य धान्य गुणवत्ता निरिक्षकांनी या गंभीर बाबीकडे लक्ष केंद्रित करावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.