मलकापूर (हॅलो बुलडाणा) तालुक्यातील कुंड बु! गावात एका किरकोळ कारणावरून काका-पुतण्यांनी तिघा मायलेकांना बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या युवकावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
नेमकं काय घडलं?
७ मार्च रोजी दुपारी अडीचच्या सुमारास लग्न समारंभात जेवण सुरू असताना, वैभव तितरे (२३) याचा गावातील विष्णू नारायण कवळेशी वाद झाला. वाद मिटवण्याचा प्रयत्न असतानाच त्याचे काका आणि पुतण्यांनी त्याच्यावर हल्ला केला. आई आशा तितरेने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता तिलाही ढकलून दिले. भाऊ गौरव तितरे मदतीला धावला असता, त्याच्या डोक्यात वीट मारून जबर जखमी करण्यात आले. वैभवलाही लाकडी काठ्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. झटापटीत त्याच्या गळ्यातील चांदीचा गोफही गायब झाला.या अमानुष मारहाणीची तक्रार शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली असून, आरोपींवर कलम 118(1), 115(2), 352, 3(5) बिएनएस अंतर्गत गुन्हा दाखल आहे. मात्र, पोलिसांनी अद्याप कोणतीही अटक केलेली नाही, आणि आरोपी मोकाट फिरत आहेत. पीडित कुटुंबाने कठोर कारवाईची मागणी केली आहे.