बुलढाणा (हॅलो बुलडाणा) शहरात 2025 साल पत्रकारांसाठी ऐतिहासिक ठरत आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सार्वजनिक जयंती उत्सव समित्यांच्या अध्यक्षपदी पत्रकारांचीच निवड झाल्याने हा ‘पत्रकार वर्ष’ ठरणार आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी ईटीव्ही भारतचे जिल्हा प्रतिनिधी निलेश राऊत यांची सर्वानुमते निवड झाली. आज (26 फेब्रुवारी) विश्राम भवन येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 2024 चे अध्यक्ष राहुल कासारे यांनी त्यांना वैचारीकरित्या पदभार सोपवला. यावेळी मोठ्या संख्येने आंबेडकरी चळवळीतील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
विशेष म्हणजे, छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक उत्सव समितीच्या अध्यक्षपदी पत्रकार राजेंद्र काळे आणि महात्मा फुले सार्वजनिक उत्सव समितीच्या अध्यक्षपदी पत्रकार लक्ष्मीकांत बगाडे यांची निवड झाली आहे. म्हणजेच, बुलढाणा शहराच्या तिन्ही प्रमुख सार्वजनिक जयंती उत्सव समित्यांवर पत्रकारांचीच निवड झाली आहे.यंदा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 144 वा जयंती महोत्सव 14 एप्रिल रोजी साजरा होणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्याच्या तयारीसाठी आजची बैठक आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन 2024 चे सचिव विनोद इंगळे यांनी केले, तर आभार अमोल खरेयांनी मानले.
2025 हे वर्ष सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे रौप्यमहोत्सवी वर्ष असल्याने हा सोहळा भव्यदिव्य करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. बुलढाणा शहरात पत्रकारांच्या नेतृत्वाखाली तिन्ही महापुरुषांच्या जयंती सोहळ्यांची तयारी जोमात सुरू झाली आहे.