लोणार (हॅलो बुलडाणा/संदीप मापारी) केंद्रीय आयुष मंत्रालय अंतर्गत 100 बेडचे योग आणि नैसर्गिक संशोधन हॉस्पिटल लोणार येथे मंजूर करण्यात यावे म्हणून केंद्रीय आयुष्यमंत्री प्रतापराव जाधव प्रयत्नरत असून, हॉस्पिटलला आवश्यक असलेली जागा पाहण्यासाठी सोमवार 10 फेब्रुवारी रोजी केंद्रीय योग आणि निसर्गोपचार संशोधन संस्था दिल्लीचे संचालक व टीम लोणार येथे येणार आहे.
या टीमला हॉस्पिटल साठी लागणारी जागा सर्व सोयीसुविधा योग्य असल्याचे आढळल्यास लोणार येथे लवकरच रुग्णांच्या सोयीसाठी 100 बेडचे हॉस्पिटल मंजूर करण्यात येईल.तसे झाले तर महाराष्ट्रातील हे पहिले शासकीय योग आणि नैसर्गिक संशोधन हॉस्पिटल होणार आहे. लोणार येथे जगप्रसिद्ध खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे, जागतिक अ वर्ग दर्जाचे पर्यटन स्थळ असल्यामुळे या ठिकाणी देश विदेशातून अनेक पर्यटक सातत्याने येत असतात हे हेरून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अमोल गीते व केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव यांनी याबाबत पाठपुरवठा करून लोणार शहरासाठी 100 बेडचे योग आणि नैसर्गिक संशोधन उपचार हॉस्पिटल केंद्रीय आयुष मंत्रालयाकडे मंजुरीसाठी आवश्यक कागदपत्राची पूर्तता करून पाठवलेले आहे.या हॉस्पिटलच्या उभारणीसाठी जवळपास दहा ते पंधरा एकर जमीन लागणार आहे सदर जमिनीची पाहणी करण्यासाठी 10 फेब्रुवारी रोजी शहरात केंद्रीय योग आणि निसर्गोपचार संशोधन संस्था दिल्लीचे संचालक व टीम येणार आहे, शहरात सर्व सोयी सुविधांनी युक्त जागा उपलब्ध झाल्यास 100 बेड चे हॉस्पिटल लवकरच मंजूर करण्यात येईल. हॉस्पिटल मंजूर झाल्यास येथे एक ते दोन वर्षात सर्व सुविधा युक्त हॉस्पिटल उभारल्या जाणार आहे.
▪️आत्मनिर्भर भारत बनण्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल!
या हॉस्पिटलमधून रुग्णांना योग मानवी निरोगी जीवनासाठी किती आवश्यक आहे याचे महत्त्व पटवून देण्यात येणार आहे, तसेच नैसर्गिक संशोधनाची पारंपारिक ज्ञान आणि आधुनिक उपकरणाच्या माध्यमातून वैज्ञानिक दृष्टिकोनातून रुग्णावर योग्य उपचार करण्यात येणार आहेत नैसर्गिक संशोधन आहार व पोषण योग चिकित्सा, मालिश जोडतोड चिकित्सा, ऍक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, क्रोमोथेरपी, मॅग्नेटोथेरपी, फिजियोथेरपी, हायड्रोथेरपी, रुग्णाचे वाढीव वजन व जाड शरीरावर उपचार करण्यात येतील, मेटा बोलीक सिंड्रोम, मधुमेह, सीवीडी स्ट्रोक, अस्थमा सीओपीडी, डोकेदुखी, आई बी एस, आई बी.डी. ऑटोइम्युनरोग , कॅन्सर, न्यूरोडीजेनेरेटीव रोगाला प्रतिबंध व उपचार या ठिकाणी करण्यात येणार आहे. अतिशय अल्प व मोफत दरात उपचार करण्यात येणार असल्यामुळे देश विदेशातून येणाऱ्या पर्यटकांना तसेच जिल्ह्यातील रुग्णांना याचा मोठा फायदा होणार आहे.