बुलढाणा (हॅलो बुलडाणा) सर्व जाती-धर्म व पंथांना सोबत घेऊन बुलढाण्यात साजरी होणारी छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची जयंती ही आता लोकोत्सव बनली असून, प्रबोधनात्मक व सांस्कृतिक कार्यक्रमाने या शहरात होणारा शिवजागर व शिवगजर हा खर्या अर्थाने कौतुकाचा विषय असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री ना.प्रतापराव जाधव यांनी केले.केंद्रीय आयुष व आरोग्य राज्य मंत्री ना.प्रतापराव जाधव हे आज गुरुवार ३० जानेवारी रोजी बुलढाणा येथे जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीसाठी आले असता, त्यांनी संगम चौक शिवस्मारकामागील ‘शिवसंपर्क’ कार्यालयाला सदिच्छा भेट दिली.
केंद्रीय आयुष व आरोग्य राज्य मंत्री ना.प्रतापराव जाधव यांचे सार्वजनिक जयंती सोहळयाचे अध्यक्ष राजेंद्र काळे यांनी पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. यावेळी बुलढाणा शहरातील शिवजयंती सोहळ्याची परंपरा व यावर्षी सोहळ्यात आयोजीत करण्यात आलेल्या कार्यक्रमांची माहिती त्यांना देण्यात आली. याप्रसंगी मंत्री महोदयांनी एखाद्या जयंती सोहळ्याचे संपर्क कार्यालय असावे, ही संकल्पनाच मूळात अनेकांना या सोहळ्याशी जोडणारी असल्याचे सांगितले. ना.प्रतापराव जाधव यांनी बराच वेळ शिवसंपर्क कार्यालयात दिला. यावेळी त्यांनी शहरातील अनेक शिवप्रेमी नागरीकांशी संवाद साधून, शहरात विविध सांस्कृतिक सोहळ्याचे आयोजन होत असल्याबद्दल गौरवोद्गार काढले.