बुलढाणा (हॅलो बुलडाणा) शासकीय लाभ म्हटलं की, ‘प्रतिष्ठित फुकट्यांच्या’ आधी उड्या पडतात अन् खरे लाभार्थी मागे राहतात,असाच काहीसा प्रकार बुलढाणा- चिखली मार्गावरील जिल्हा बांधकामगार केंद्रावर पाहायला मिळतोय.इथे नाव नोंदणीसाठी कडाक्याच्या थंडीत रात्री एक वाजतापासून तोबा गर्दीचे चित्र दररोजचे दिसते. शासकीय लाभासाठी नाव नोंदणी करिता प्रतिष्ठित ‘फुकट्यांच्या’ उड्यावर उड्या पडत असून,गरजू आणि खरे लाभार्थी वंचित राहण्याच्या स्थितीत आहेत. अनेक गोरगरीब लाभार्थ्यांना रात्री 1 वाजता रांगेत नंबर लावल्यावर सकाळी 5 वाजता मोठ्या मुश्किलीने नंबर लागतो. त्यामुळे यंत्रणेने याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे.
शासनाकडून बांधकाम कामगारांना विविध सोयी-सुविधा देण्यात येतात. त्यासाठी मात्र संबंधित कामगाराची रितसर नोंदणी असणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने गत काही दिवसांपासून ही प्रक्रिया राबविण्यात येत असून नोंदणी करण्याकरिता कामगारांची चिखली रोड वरील कार्यालयावर रात्री बेरात्री अक्षरश: झुंबड उडत आहे. कार्यालयासमोर पाय ठेवायलाही जागा उरत नाही.गरजू लाभार्थ्यांसोबत फुकट्यांची अचानक गर्दी वाढल्याचे दिसून येत आहे.तर खरे लाभार्थी त्रस्त होताहेत.
▪️प्रतिष्ठांचा या लाभावर डोळा!
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळांतर्गत नोंदीकृत कामगारांना गृह उपयोगी वस्तू खरेदीसाठी अर्थसहाय्य, लाभार्थी कामगारांच्या पाल्ल्यास व्यक्तिमत्व विकास पुस्तक संचाचे वाटप, विविध कल्याणकारी योजनेचे आर्थिक सहाय्य, अवजारे खरेदी करण्यासाठी 5 हजार रुपये अर्थसहाय्य, अत्यावश्यक संच, सुरक्षा संच खरेदीसाठी अर्थसहाय्य देण्यात येते. त्याचा लाभ मिळवू इच्छित जिल्ह्यातील बांधकाम कामगारांसह प्रतिष्ठित फुकट्यांनी देखील नोंदणी करण्यासाठी सदर कार्यालयात गर्दी केल्याने संताप व्यक्त केला जात आहे.