देऊळगाव राजा (हॅलो बुलडाणा /संतोष जाधव) समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. आज सकाळी 5.30 वाजता नागपूर कॅरीडोअरवरील चानैज क्रमांक 295.2 येथे आयशर ट्रकला मागून धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात आयशरचा चालक अमित कुमार यादव (पालघर) जागीच ठार झाला.
अमित कुमार यादव हा आयशरने नागपूरच्या दिशेने जात असताना झोपेच्या डुलकीमुळे समोरील ट्रक (CG-04-MF-6243) ला जोरदार धडक दिली. अपघात एवढा भीषण होता की यादव हा आयशरच्या स्टेरिंगमध्ये अडकून मरण पावला.
घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांचे अधिकारी संदीप इंगळे, गजानन उज्जैनकर व त्यांची टीम तात्काळ घटनास्थळी पोहोचली. QRV टीमच्या मदतीने आयशरचा पत्रा कापून मृतदेह बाहेर काढण्यात आला. समृद्धी महामार्ग ॲम्बुलन्सवरील डॉक्टरांनी तपासणी केली असता यादवला मृत घोषित केले.
अपघातग्रस्त वाहनांना क्रेनच्या साह्याने बाजूला करण्यात आले व महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली. या दुर्दैवी अपघाताचा पुढील तपास मेहकर पोलीस करत आहेत. महामार्गावर अपघात रोखण्यासाठी उपाययोजना होणार की नाही, हा मात्र गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे!