बुलढाणा (हॅलो बुलडाणा) बुलढाण्यातील मानस फाउंडेशनने तिळगुळाच्या गोडव्याबरोबरच वैचारिक पेरणीसाठी आगळावेगळा उपक्रम राबवत तीळ संक्रांतीला पुस्तकांचे वाण दिले. विधवा महिलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सन्मानाने सहभागी करून घेण्यासाठी या उपक्रमाने विशेष संदेश दिला.तुलसी नगर येथे आयोजित कार्यक्रमात विधवांना ताराबाई शिंदे यांच्या “स्त्री-पुरुष तुलना” या पुस्तकाचा वाण देण्यात आला. सवाष्ण महिलांनी विधवांना कुंकू लावून सन्मान केला. शेकडो महिलांनी सहभाग घेतलेल्या या कार्यक्रमात विधवांची उपस्थिती लक्षणीय होती.
“विधवा महिलांना बंधूभावाची वागणूक दिली पाहिजे,” असे आवाहन प्रा. डी. एस. लहाने यांनी केले. शिवाय ताराबाई शिंदे यांनी मांडलेले विचार महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रेरक ठरतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
या उपक्रमामुळे समाजातील विधवा महिलांचा सन्मान व त्यांना वैचारिक प्रेरणा देणारा हा आगळा उपक्रम बुलढाण्यात आदर्श ठरला आहे.