चिखली (हॅलो बुलडाणा/ सय्यद साहिल) चिखली नगर परिषदेत सफाई व्यवस्थेतील अनियमितता आणि कथित आर्थिक गैरप्रकारांसाठी शिवसेनेचे युवासेना शहरप्रमुख आनंद गैची यांनी जिल्हाधिकाऱ्यांना त्वरित चौकशी करण्याची मागणी केली आहे. गेल्या 12 महिन्यांपासून नगर परिषदेकडून कचरा व्यवस्थापनासाठी नियुक्त केलेले ठेकेदारांचे आदेश कालबाह्य झाले असून, तरीही त्या ठेकेदारांकडून काम सुरू आहे, असा गंभीर आरोप गैची यांनी केला आहे.
निवेदनात गैची यांनी स्पष्ट केले की, “चिखली शहरातील सफाई व्यवस्था पूर्णपणे ठप्प झाली आहे. कचर्याचे डोंगर उभे राहिले असून, सांडपाणी व्यवस्थापन सुद्धा बंद पडले आहे. घंटागाडी आणि इतर सफाई सेवांमुळे शहरातील स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला आहे, आणि यामुळे नागरिकांना स्वास्थ्यविषयक गंभीर समस्यांना सामोरे जावे लागत आहे.”
युवासेना शहरप्रमुखांनी आरोप केला की, ठेकेदारांचे कामकाज नागरिकांच्या अपेक्षांना पूर्ण करत नाही, ज्यामुळे सार्वजनिक आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होत आहे. “ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून दोषींवर तातडीने कारवाई करावी, अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन सुरू केले जाईल,” असा इशारा गैची यांनी दिला.
चिखली नगर परिषदेत होणाऱ्या या अनियमिततेमुळे नागरिकांच्या जीवनमानावर गडबड निर्माण झाली आहे. सफाई सेवा असफल होण्यामुळे चिखलीतील नागरिक अस्वच्छतेच्या गर्तेत सापडले आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेच्या युवासेनेने केली आहे.