चिखली (हॅलो बुलडाणा) चिखली तालुक्यातील कव्हळा येथे कधी कोणाची आणि कशी शिकार होईल? त्याचा नेम राहिला नाही.’रात्र आपलीच आहे!’ या अविर्भावात येथे बिबट्या वावरत आहे. त्यामुळे शेती कशी करायची? असा प्रश्न निर्माण झाला असून शेतमजुरांना पोट भरण्यासाठी जीव मुठीत धरावा लागतोय.अशी गंभीर परिस्थिती असली तरी यंत्रणा मात्र मूग गिळून आहे. बिबट्याने एखादा बळी घेतल्याची वाट तर यंत्रणा पाहत नाही ना? असा प्रश्न उपस्थित होतोय.
बिबट्यांच्या भौगोलिक स्थानांवरील माणसांच्या वाढत्या अतिक्रमणामुळे अलीकडील काळात बिबिट्या निघण्याच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे.
चिखली तालुक्यातील कव्हळा परिसरातील पाळीव जनावरे, तसेच मानवी वस्तीमध्ये बिबट्याने शिरकाव केल्यामुळे मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याला जेरबंद करून सुरक्षित ठिकाणी हलवण्यात यावे, अशी मागणी येथील ग्रामस्थांकडून होत आहे.बिबट्याचा मानवी वस्तीत शिरकाव झाल्याने हल्ले वाढण्याची दाट शक्यता आहे. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी अनेक शासकीय नियमावली आहेत. तर दुसरीकडे गावांच्या हद्दी विस्तारत असल्याने ऊस, मका यासारख्या पिकांच्या क्षेत्रात मिळणारी लपण यामुळे निवा-यासाठी मानवी वस्तीकडे हे बिबटे धाव घेत आहेत. याशिवाय शेतीच्या परिसरातील पाळीव प्राणी, डुकरे यासारख्या प्राण्यांमुळे त्यांच्या भक्ष्याचीही सोय होत असल्याने बिबटे या परिसरात निघाल्याच्या घटना घडत आहेत. कव्हळा परिसरात सध्या बिबट्याची दहशत वाढत असून,हा बिबट्या रात्री कुणाची शिकार करेल हे सांगता येत नाही.त्यामुळे संबंधित यंत्रणेने नागरिकांच्या सुरक्षेसाठी पावले उचलावीत अशी मागणी केली जात आहे.