देऊळगाव राजा (हॅलो बुलढाणा) एका महिन्यांपासून राजकीय संभ्रम कायम ठेवून वरकरणी तळ्यात-मळ्यात अशी भूमिका दर्शविणारे सिंदखेड राजा मतदारसंघाचे आमदार राजेंद्र शिंगणे आज सायंकाळी ‘तुतारी’ फुंकणार असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.
शिंगणे यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परतण्याचा मुहूर्त ठरला असून आज हा पक्षप्रवेश सोहळा होणार असल्याचे सांगितले जात आहे.तब्बल पाचवेळा सिंदखेड राजा मतदारसंघाचे आमदारपद भूषवणारे शिंगणे यांनी मागील महिनाभरापासून मतदारसंघातील राजकीय संभ्रम कायम ठेवला. तांत्रिकदृष्ट्या ते अजित पवार यांच्यासोबत होते, मात्र मनाने शरद पवारांसोबत! यामुळे, महायुतीकडून लढणार की शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परतणार? याबद्दल संभ्रम कायम ठेवण्याचे त्यांचे डावपेच यशस्वी ठरले. आता त्यांनी ‘तुतारी’ फुंकण्याचा निर्णय घेतला असून आज ते शरद पवार गटात दाखल होणार आहेत.