साखरखेर्डा (हॅलो बुलढाणा/दर्शन गवई) आज केंद्र सरकारने मराठी , पाली या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला. हा मराठी भाषेचा आणि महाराष्ट्राचा सन्मान आहे. पण हेच सरकार मराठी शाळा बंद करण्याचा घाटही घालत आहे. त्यामुळे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देऊन सन्मान केला की मराठी माणसाचा हक्क हिरावून घेतला हेच कळत नाही. असा आरोप वंचित बहूजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी साखरखेर्डा येथील वंचित बहूजन आघाडीच्या मेळाव्यातून जाहिर सभेला संबोधित करताना केला.
यावेळी वंचित आघाडीच्या नेत्या सविता मुंढे, विशाल गवई यांच्यासह वंचित आघाडीचे जिल्हाध्यक्ष सर्व तालुकाध्यक्ष आकाश श्रीमंत गवई, अक्षय मधुकर गवई व त्यांचे सहकारी उपस्थित होते.आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात आंबेडकर म्हणाले की जिल्हा परिषद, नगर परिषद, महानगरपालिका शाळेत गरीब, मागासवर्गीय, मध्यमवर्गीय,ओबीसी यांची मुले मराठी शाळेत जातात शिक्षण घेतात.आज ५०० मराठी शाळा बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला. खेड्या, पाड्यातील, तांडा, वस्तीमधील शाळांचा यात समावेश आहे. तांडा वस्तीमधील मुलं ही ऊसतोड मजुरांची मुले असतात. तर खेड्यापाड्यात शिकणारी मुले ही शेतमजूर, शेतकऱ्यांची असतात. आज ह्या खेड्यापाड्यातील आणि तांडा वस्तितील शाळा बंद झाल्या तर या मुलांची शिक्षणाची दारे कायम बंद करण्याचा अप्रत्यक्ष प्रयत्न या सरकारने सुरू केला आहे. श्रीमंत, उद्योजक, व्यापारी, उच्चवर्णीय, नेत्यांची मुले इंग्रजी खाजगी स्कूलमध्ये शिक्षण घेतात.एकदा का शिक्षणाचे बाजारीकरण झाले की शाळा नेत्यांच्या राहतील. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देऊन आमची थट्टा करु नका ! मराठी भाषा जिवंत ठेवायची असेल तर सर्व मराठी शाळा सुरु राहिल्या पाहिजेत यासाठी पुढचा लढा आपणाला लढावा लागणार आहे.अन्यथा आपली मुलं शिक्षणापासून वंचित राहतील आणि पुन्हा पेशवे कालीन सरकार येऊन आपली आर्थिक, शैक्षणिक प्रगतीचे मार्ग बंद होतील . यासाठी आताच जागृत झाले पाहिजे.असे परखड विचार त्यांनी जगद्रगुरु श्री पलसिध्द महास्वामी मठातील एका कार्यक्रमात बोलताना मांडले. यावेळी प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता.