साखरखेर्डा (हॅलो बुलढाणा/दर्शन गवई)पोलीस स्टेशन अंतर्गत शिंदी येथील एका महिलेवर दारू विक्री प्रकरणी ४५ गुन्हे दाखल झाले असता वारंवार सुचना देऊनही अवैध दारू विक्री सुरुच ठेवली. त्या प्रकरणी साखरखेर्डा पोलिसांनी तडीपार करण्यात का येऊ नये असा प्रस्ताव सादर केला होता. आज २३ सप्टेंबर रोजी तो आदेश पारित करण्यात आला.
शिंदी गावात गेल्या कित्येक वर्षांपासून अवैध दारू विक्री करीत असलेली महिला श्रीमती लक्ष्मीबाई मारोती वाघमारे वय ५३ वर्ष यांच्यावर अवैध दारू विक्री प्रकरणी वारंवार दारू प्रतिबंध करण्यासाठी गुन्हे दाखल केले होते. तब्बल ४५ गुन्हे दाखल करण्यात आल्यानंतरही अवैध दारू विक्री करणे, दारुचा साठा करुन ठेवणे प्रकरणी साखरखेर्डा पोलिसांच्या अभिलेखावर गुन्हे दाखल आहेत. उपरोक्त प्रकरणी श्रीमती लक्ष्मीबाई मारोती वाघमारे या महिलेला तडीपार करण्याचा प्रस्ताव तत्कालीन ठाणेदार स्वप्निल नाईक यांनी तयार करून जिल्हा पोलीस अधीक्षक सुनिल कडासने, अप्पर पोलीस अधीक्षक बी बी महामुनी, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील यांच्याकडे पाठविला होता. त्यांचे मार्गदर्शन घेऊन उपरोक्त प्रस्ताव उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांना सादर केला. वरील प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६ (१)(ब) अन्वये सहा महिने जिल्हा बंदीचे आदेश पारित केला आहे. आज २३ सप्टेंबर रोजी साखरखेर्डा पोलिसांनी श्रीमती लक्ष्मीबाई मारोती वाघमारे हिला तडीपार आदेश बजावला आहे. जवळच्या वाशिम जिल्हा वगळता अकोला जिल्ह्यात सदर महिलेचे वास्तव्य राहणार आहे.
सदरची कारवाई ही जिल्हा पोलीस अधीक्षक विश्र्व पानसरे, अप्पर पोलीस अधीक्षक बी बी महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील, पोलीस निरीक्षक अशोक लांडे ( जिल्हा गुन्हे अन्वेषण विभाग ) यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक गजानन करेवाड , पो . हे . काॅ . राजेश जाधव , राजेश गीते , संजय भुजबळ यांनी केली आहे.
▪️शिंदीच्या सरपंच साधना अशोक खरात काय म्हणतात ?
एका महिलेला तडीपार केले, तिघांचे काय ?
साखरखेर्डा पोलीस स्टेशन अंतर्गत शिंदी , हिवरा आश्रम , वडगावमाळी , सावंगी माळी , गुंज , वरोडी , गोरेगाव येथेही मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री सुरु आहे . गेल्या आठवड्यात चक्क हिवरा आश्रम येथील महिलांनी साखरखेर्डा पोलीस स्टेशन मध्ये येऊन ठाणेदार गजानन करेवाड यांना घेराव घालून अवैध दारू विक्री बंद करण्याची मागणी केली होती . निवेदन देऊनही पोलीसांनी कोणतीच कारवाई केली नाही , म्हणून चक्क महिलांनी दारू पकडून पोलिसांच्या ताब्यात दिली . हाच प्रकार या पुर्वी उपरोक्त गावातील महिलांनी केला होता . आजही शिंदी गावात तीन ठिकाणी अवैध दारू विक्री सुरु असून ती पोलीसांनी बंद करावी . जे ने करुन उध्वस्त होणारे संसार सुखाचा मार्गाने संसार करतील.