बुलढाणा (हॅलो बुलढाणा) आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खामगाव विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसचे माजी आमदार दिलीप कुमार सानंदा आणि धनंजय देशमुख यांच्या कडून उमेदवारीचा दावा केला जात आहे.या दोघांमध्ये तिकिटासाठी संघर्ष दिसून येत असून परवा धनंजय देशमुख यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्यात.
एकेकाळी काँग्रेसचा गड असलेल्या खामगाव विधानसभा मतदार संघात दोन पंचवार्षिक निवडणुकीत काँग्रेसला पराभवाला सामोरे जावे लागले. दरम्यान गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात काहीशी उभारी घेतल्याने आता काँग्रेसी नेत्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. खामगावातील नेत्यांनी आता सावध भूमिका घेतली आहे, माजी आमदार दिलीप कुमार सानंदा व धनंजय देशमुख यांनी उमेदवारीसाठी पक्षश्रेष्ठीकडे भेटीगाठी वाढल्या तर मतदार संघात पायाला भिंगरी बांधून जनसंपर्क दांडगा करण्याचा प्रयत्न सुरू आहे.शिवाय रणनीती सुद्धा आखली जात आहे.परवा काँग्रेस नेते धनंजय देशमुख यांनी मनोज जरांगे यांची भेट घेऊन चर्चा केली. दरम्यान
‘मराठा आरक्षण व नवीन चेहऱ्यांना संधी’देण्याची भूमिका काँग्रेसने घेतल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.आगामी निवडणुकीत खामगाव मतदार संघावर देशमुख यांनी दावा ठोकला असून पक्षश्रेष्ठींकडे मी उमेदवारी मागितली असून महाराष्ट्रात नवीन चेहऱ्यांना संधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे ते म्हणाले.’मराठा कार्ड व नवीन चेहऱ्यांना संधी’ अशी खेळी भाजपला शह देण्यासाठी काँग्रेस खेळत असून पुढे काय होईल?याचे उत्तर येणारी वेळच देणार आहे.