spot_img
spot_img

‘उबाठा’च्या संदीप शेळकेंची पीडित कुटुंबाच्या वेदनेवर फुंकर! -शिवसेनेकडून गोमाल गावात ब्लँकेट, ब्लिचिंग पावडर इतर साहित्याचे वाटप! -लोकप्रतिनिधी व प्रशासन नेमकं करते काय?शेळकेंचा सवाल!

जळगाव जामोद (हॅलो बुलढाणा) अतीदुर्गम भागातील गोमाल येथे एका तरुणीसह दोन चिमुकल्यांचा आतिसाराने दुदैवी मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा नेते संदीप शेळके यांनी 12 सप्टेंबर रोजी जळगाव जामोद तालुक्यातील गोमाल गावाला भेट दिली. दुःखाचा डोंगर कोसळलेल्या कुटुंबियांना धीर देत त्यांच्या वेदनेवर फुंकर घातली.ग्रामस्थांसोबत चर्चा करून गावातील आरोग्य, शैक्षणिक सुविधा, पिण्याचे पाणी याबाबत जाणून घेत पक्षाच्यावतीने ब्लँकेट, ब्लिचिंग पावडर आणि इतर साहित्याचे वाटप केले.

गोमाल हे 600 लोकसंख्येचं गाव. शिक्षण, आरोग्य, दळणवळण सुविधेचा अभाव असलेला हा भाग आहे. तिथं जायला आजही धड रस्ता नाही. चिखल तुडवत अन चढ उताराची कसरत करत जावे लागते. स्वातंत्र्याच्या 77 वर्षांत चांगला रस्ता, चांगली आरोग्य सुविधा, शिक्षण, पिण्याचे पाणी या सुविधा सुद्धा या गावाच्या नशिबी नाहीत म्हटल्यावर लोकप्रतिनिधी व प्रशासन नेमकं करते काय? असा सवाल संदीप शेळके यांनी केला. गोमालला साधं चालत जायलाही आपल्याही अवघड होतं. तर घटनेच्या रात्री नातेवाईकांनी बांबूची झोळी करुन किर्रर्र अंधारात रुग्णाला कसे नेले असेल? ही कल्पनाही करवत नाही. जर वेळेवर वैद्यकीय सुविधा मिळाली असती तर एका तरुणीसह दोन चिमुकले जीव वाचले असते. या घटनेपासून लोकप्रतिनिधी व प्रशासनाने धडा घ्यावा, असेही संदीप शेळके म्हणाले. यावेळी जळगावचे नगरसेवक रमेश ताडे, कुंवरदेव – गोमाल सरपंच पुमानसिंग, हिरोसिंगजी, रविन मुजलदार, वासुदेव वायझोडे, शाम वायझोडे, गजानन वायझोडे, अरुण पाटील, कृष्णा दाभाडे, रामू राजपूत, शरद अवचार, सतीश बहुरूपी, यश इधोकार, वैभव आढाव, पंकज जाधव, रोहन बकाल उपस्थित होते.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!