मेहकर (हॅलो बुलढाणा) राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांच्या सुरळीत सेवेसाठी दर सोमवार व शुक्रवारी ‘प्रवासी राजा दिन’ हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. परंतु प्रत्यक्षात ‘प्रवासी राजा दीन’ झाल्याचे अस्वस्थ चित्र आहे.मेहकर तालुक्यात ग्रामीण भागातील 50 ते 60 विद्यार्थ्यांची बसेस अभावी अद्यापही फरफट सुरू आहे.शिक्षणा पासून मुलांना वंचित ठेवणारे राज्य परिवहन महामंडळ कोण?असा संतप्त सवाल विचारला जात आहे.
‘प्रवाशांच्या सेवेसाठी ‘ हे ब्रीदवाक्य असलेल्या राज्य परिवहन महामंडळाने ग्रामीण भागातील सेवेबद्दल लक्तरे वेशीवर टांगून ठेवली आहे. एकीकडे शासन शिक्षण घेण्यासाठी खेड्यापाड्यातील शिक्षणाच्या प्रवाहा बाहेरील मुला-मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी मोठा गाजावाजा करतआहे.तर दुसरीकडे शासनाच्याच उपायोजना अभावी शिक्षण घेण्यासाठी खिळ निर्माण होत आहे.विधानसभा निवडणुका तोंडाजवळ आल्याने केवळ मुख्यमंत्री लाडली बहीण योजना चा बोलबाला सुरू आहे.दुसरीकडे 15 ऑगस्ट, स्वातंत्र्य दिन आला तरी,बुलढाणा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना अजून गणवेश वाटप झालेला नाही.ते मुख्यमंत्र्यांचे लाडके विद्यार्थी नसावेत!गणवेश घालून शिक्षण घेता येते असे नाही,तर शाळेत जाण्यासाठी दुर्गम भागात चाळणी झालेले रस्ते दुरुस्त होत नाहीत.त्यात जानेफळ घुटी- पारडी मार्गावर विद्यार्थ्यांसाठी बस सेवा नाही. विद्यार्थ्यांना पारडी ते जानेफळ हा सात किलोमीटरचा रस्ता मार्गक्रमण करावा लागत आहे.दरम्यान अनेक विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्याने शाळेत जाण्यास ते टाळाटाळ करतात.याबाबत आगार व्यवस्थापकांना तक्रार देण्यात आली आहे.परंतु या तक्रारीचे निराकरण होणार की नाही हा प्रश्नच आहे.