चिखली (हॅलो बुलढाणा/ सय्यद साहिल) अवघ्या पाच मिनिटांत तब्बल २१ विषय मंजूर? ना पुरेशी चर्चा, ना हरकतींना संधी! चिखली नगरपरिषदेच्या १८ नोव्हेंबरच्या सर्वसाधारण सभेवरून आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विरोधी नगरसेवकांनी नगरपरिषद प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर आक्षेप घेत थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे.
बॉम्बे मार्केटचा विकास की नियमांना बगल?
बॉम्बे मार्केटच्या BOT प्रकल्पाभोवती संशयाचे ढग निर्माण झाल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. प्रकल्पाचा आर्थिक आराखडा काय? मालमत्तेचे मूल्यांकन किती? विकासकाची निवड कशी झाली? कराराच्या अटी काय? या प्रश्नांची उत्तरे सार्वजनिक करण्याची मागणी करण्यात आली.
विशेष म्हणजे, प्रकल्पासाठी आवश्यक दोन-तृतीयांश बहुमत आणि शासनाची पूर्वमान्यता मिळाली आहे का, असा थेट सवाल विरोधकांनी उपस्थित केला.
व्यापाऱ्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न ऐरणीवर!
बांधकामादरम्यान व्यापारी कुठे जाणार? पर्यायी जागा कोण देणार? नुकसानभरपाई किती मिळणार? नवीन गाळ्यांचे दर कोण ठरवणार? जुन्या व्यापाऱ्यांना प्राधान्य मिळणार का? या सर्व बाबींची लेखी हमी देण्याची मागणी करण्यात आली.
त्यातच मालमत्ता करवाढीच्या प्रस्तावावरूनही विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली. नागरिकांच्या खिशावर अतिरिक्त बोजा टाकण्याआधी नगरपरिषदेने स्वतःच्या उत्पन्न-खर्चाचा हिशेब मांडावा, असा सवाल उपस्थित करण्यात आला.
‘पाच मिनिटांचा निर्णय’ आता जिल्हाधिकाऱ्यांच्या कसोटीवर!
सभेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग, इतिवृत्त आणि ठरावाची कायदेशीर वैधता तपासून प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कार्यवाही थांबवावी, अशी मागणी करण्यात आली.
पत्रकार परिषदेला विरोधी पक्षनेते डॉ. मोहम्मद इसरार, गटनेते गावंडे, गोपाल देव्हडे, डॉ. अमोल लहाने, जकाउल्ला खान, उबेद अली खान, रत्नदीप शिनगारे, संतोष देशमुख, पी. एस. वायाळ, गोकुळ शिंगणे, प्रशांत भटकर आणि आनंद बोंद्रे उपस्थित होते













Total Users : 3807426