मेहकर (हॅलो बुलढाणा) आईला सोबत घेऊन लेक मेहकरहून जानेफळकडे निघाला होता. बाईकवर मागे बसलेली आई… समोर रस्ता… आणि मनात घरचीच काहीतरी छोटीशी कामं. पण कंचनीच्या महालाजवळ समोरून आलेल्या काळाने सगळं संपवलं.
शुक्रवारी घडलेली ही घटना आजही पाहणाऱ्यांच्या डोळ्यासमोरून जात नाहीये.
जानेफळकडून मेहकरकडे येणारा मालवाहू ट्रक (एमपी ३९ टी एक्स ४३३३) चुकीच्या दिशेने समोरून आला. त्याने दत्तात्रयाच्या दुचाकीला इतक्या जोरात धडक दिली की, दुचाकीस्वार दत्तात्रय वासुदेव दहातोडे (वय २८, रा. कोयाळी, ता. लोणार) आणि त्याची आई रत्नमाला वसुदेव दहातोडे असे दोघेही रस्त्यावर फेकले गेले. रस्त्यावर पडलेला लेक, रक्ताने माखलेली आई आणि मदतीसाठी धावणारी माणसं… हे दृश्य पाहून अनेकांच्या काळजाचं पाणी झालं. जखमी आईला तातडीने उपचारासाठी पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले. पण लेक दत्तात्रय याला जालना येथे पोहोचेपर्यंतच त्याने अखेरचा श्वास घेतला. दवाखान्यात पोहोचेपर्यंत काळाने त्याला हिरावून नेलं होतं.२८ वर्षांचा तरुण, घराचा आधार, आईचा लाडका एका चुकीच्या ओव्हरटेकने, एका चुकीच्या दिशेने सगळं संपलं. ही बातमी कोयाळी गावात पोहोचताच गावावर शोककळा पसरली. ज्या आईने लेकाला जन्म दिला, वाढवलं, आज त्याच आईसमोर लेकाचा मृतदेह होता, यापेक्षा मोठं दुःख काय असू शकतं?
आई रुग्णालयात मृत्यूशी झुंज देतेय, आणि लेकाने मात्र या जगाचा निरोप घेतलाय.













Total Users : 3807428