जळगाव जामोद (हॅलो बुलढाणा) हातात कौशल्य असले की भाकरी कधीच कमी पडत नाही, हाच विचार मनात घेऊन वैशालीताई पाटील जनसेवा फाऊंडेशनने ग्रामीण महिलांच्या आयुष्याला नवी दिशा देणारा निर्णय घेतला आहे.
घराच्या चार भिंतीत अडकलेल्या, शिकूनही नोकरी नसलेल्या हजारो महिला आणि मुलींसाठी ही बातमी म्हणजे आशेचा किरण आहे. फाऊंडेशनतर्फे जळगाव जामोद, संग्रामपूर आणि शेगाव या तीनही तालुक्यातील प्रत्येक गावात आणि प्रत्येक नगरात मिळून तब्बल ३२० शिवणकला विद्यालये स्थापन केली जाणार आहेत.विशेष म्हणजे प्रवेश १००% फ्री राहील. कोणत्याही महिलेला, मुलीला एक रुपयाही फी नाही.उषा कंपनीच्या ३२० मशिन फ्री शिकण्यासाठी अत्याधुनिक मशिन फाऊंडेशनच देणार आहे.
आज अनेक घरात महिला शिकल्या, पण घराबाहेर पडून काम करण्याची संधी नाही. महागाईत संसाराला हातभार लावायचा आहे, पण भांडवल नाही. अशा वेळी ही शिवणकला म्हणजे फक्त शिलाई नाही, तर स्वाभिमानाने जगण्याची कला आहे. एका मशिनमधून एका घराची चूल पेटू शकते, एका मुलीचे शिक्षण होऊ शकते. वैशालीताई पाटील यांनी हेच ओळखले आहे. “महिला शिकली तर घर घडते आणि महिला कमवती झाली तर गाव घडते” या भावनेतून हा उपक्रम सुरू होत असल्याचे फाऊंडेशनकडून सांगण्यात आले. लवकरच गावागावात हे विद्यालय सुरू होणार असून इच्छुक महिलांनी संपर्क साधावा, असे आवाहन वैशालीताई पाटील जनसेवा फाऊंडेशन, जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघ यांच्यावतीने करण्यात आले आहे.





Total Users : 3677222