बुलढाणा (हॅलो बुलढाणा) अवैध रेती वाहतुकीवर कारवाई करणाऱ्या तहसीलदार आणि महसूल पथकाच्या वाहनाला टिप्परने धडक देत जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या गंभीर प्रकरणातील फरार आरोपी हर्षल मनोहर अंभोरे याचा अखेर ‘खेळ खल्लास’ झाला आहे! स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला छत्रपती संभाजीनगर येथून मोठ्या शिताफीने जेरबंद केले.
१९ ऑगस्ट रोजी सकाळी देऊळगाव राजा तहसीलदार वैशाली डोंगरजाळ या महसूल कर्मचाऱ्यांसह अंढेरा फाटा परिसरात अवैध गौणखनिज वाहतुकीविरोधात कारवाई करीत होत्या. यावेळी विनापरवाना चार ब्रास रेती वाहून नेणारा पांढऱ्या रंगाचा टिप्पर पथकाने पकडल्याचे पोलिसांच्या वार्तापत्रात नमूद आहे.
कारवाईदरम्यान आरोपी हर्षल अंभोरे याने टिप्पर चालकाला, “मध्ये कोणी आले तर उडवून टाक, नंतर मी बघून घेतो,” असे सांगितल्याचा आरोप आहे. टिप्पर चालकाने पळून जाताना महसूल पथकाच्या वाहनाला जीवे मारण्याच्या उद्देशाने धडक दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. हर्षलने स्वतःचे वाहन तहसीलदारांच्या वाहनासमोर आडवे लावून टिप्परला पळून जाण्यास मदत केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी अंढेरा पोलिसांनी विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला होता. घटनेनंतर हर्षल फरार झाल्याने त्याच्या अटकेसाठी जिल्ह्यातील तलाठी, पटवारी आणि महसूल कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारत प्रशासनाला इशारा दिला होता.
अखेर गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे एलसीबीने ४ सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगरातून २३ वर्षीय हर्षलला पकडले. त्याला अंढेरा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिनेश घुगे करीत आहेत.सदर कामगिरी मा.श्री. निलेश तांबे पोलीस अधीक्षक बुलडाणा यांचे आदेशान्वये श्री. अमोल गायकवाड, अपर पोलीस अधीक्षक बुलढाणा., श्री. पियुष जगताप, अपर पोलीस अधीक्षक खामगांव यांचे मार्गदर्शनाखाली पोनि, श्री. हेमंत ठाकरे यांचे नेतृत्वात पोउपनि, प्रताप बाजड, पोहेकॉ. शरदचंद्र गिरी, जगदेव टेकाळे, युवराज राठोड, पुरुषोत्तम आघाव, पोकाँ. अमोल अंभोरे, मपाकॉ. पूजा जाधव, चालक पोकों, विलास भोसले, स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा, पोहेकॉ. राजु आडवे, पोहेकों, पवन मखमले, पोकों, ऋषीकेश खंडेराव, कैलास ठोंबरे तांत्रीक विष्लेषण विभाग, बुलढाणा यांच्या पथकाने केली.













Total Users : 3393690