spot_img
spot_img

जिल्हा बँकेच्या ‘अध्यक्षपदाची’ माळ कोणाच्या गळ्यात पडणार? केंद्रीय मंत्री जाधव, डॉ. शिंगणे व कामगार मंत्री फुंडकर रेसमध्ये..!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) सध्या जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? याची चर्चा सुरू झाली असून, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, डॉ.राजेंद्र शिंगणे, कामगार मंत्री आकाश फुंडकर

यांची नावे चर्चिल्या जात आहे. शिंगणे यांची सहकारातील पकड व जाधवांचे राजकीय वजन भारी पडेल की ना. फुंडकरांच्या भाजप पक्षाची चालती राहील हे लवकरच दिसून येणार आहे.

सहकार क्षेत्रात प्रतिष्ठेच्या समजल्या जाणार्‍या दि बुलडाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेचा निवडणूक निकाल २४ ऑगस्ट रोजी जाहीर झाला. निवडणूक झालेल्या ९ जागांमधून ७ जागा सहकार पॅनलला मिळाल्या, तर २ जागा ह्या स्व. अजीतदादा पवार शेतकरी परिवर्तन पॅनलच्या पारड्यात गेल्या. यापुर्वीच सहकार पॅनलचे १२ जण अविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या नेतृत्वात २१ संचालक मंडळामध्ये १९ जागा सहकार पॅनलने पटकावून जोरदार मुसंडी मारली आहे. तर अगदी वेळेवर या निवडणुकीत उतरलेल्या परिवर्तन पॅनलनेही २ जागांवर झेंडा फडकवला. दरम्यान अध्यक्षपदासाठी आता संगीत खुर्ची रंगणार असल्याचे दिसते. कामगार मंत्री आकाश फुंडकर यांचे हितचिंतक म्हणतात की, आतापर्यंत काँग्रेस विचारधारेचे अध्यक्ष होते पण आता भाजपाच्या विचारसरणीचे अध्यक्ष हवेत ते म्हणजे कामगाराचे हित जोपासणारे ना. फुंडकर तर सहकार महर्षी म्हणून संबोधले जाणारे डॉ. राजेंद्र शिंगणे यांची सहकार क्षेत्रातील मजबूत पकड सर्वश्रुत आहे. त्यामुळे तेच अध्यक्ष होणार असल्याचे भाकीत त्यांचे कार्यकर्ते वर्तवित आहेत. तसेच केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव राजकीय समीकरण घडवून आणतात. त्यांचे राजकारणातील वजन पाहता ना. जाधवच बँकेचे अध्यक्ष होणार असल्याचे त्यांचे समर्थक म्हणत आहेत.परंतु जिल्हा बँकेची सत्ता म्हणजे केवळ खुर्ची नाही तर सहकारातील पुढच्या राजकीय समीकरणाची दिशा ठरविणारी ताकद आहे. संचालकांचा विश्वास कोण जिंकतो आणि कुणाच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडते याकडे सर्वांचे लक्ष खिळले असून पक्ष कार्यकर्ते अध्यक्ष पद आपल्याच नेत्याला मिळावे यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून भावना व्यक्त करीत आहेत.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!