बुलढाणा (हॅलो बुलढाणा) बुलढाणा शहराच्या प्रवेशद्वारांवरील कचऱ्याचा प्रश्न अद्याप धगधगत असतानाच आता माळविहीर परिसरातील प्रस्तावित कचराडेपोवरून नवा संघर्ष पेटला आहे. नगरपालिकेच्या सुधारित धोरणानुसार हनवतखेड येथील कचराडेपो माळविहीर परिसरात हलविण्यात आल्याचे समजताच ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांचा संताप उफाळून आला. आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी थेट कचरागाड्यांचा मार्ग रोखत प्रशासनाच्या निर्णयाला कडाडून विरोध केला.
माळविहीर परिसरातील जागा कचराडेपोसाठी हस्तांतरित करताना नगरपालिका प्रशासनाने ग्रामपंचायतीचा ठराव घेतला नाही. तसेच स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांची पूर्वसंमतीही घेण्यात आली नसल्याचा गंभीर आरोप आंदोलकांनी केला आहे. गावाच्या आरोग्याशी आणि शेतकऱ्यांच्या सुरक्षेशी संबंधित एवढा मोठा निर्णय कोणाला विश्वासात न घेता कसा घेण्यात आला, असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला.
प्रस्तावित कचराडेपोमुळे परिसरात दुर्गंधी, माशा, डास आणि संसर्गजन्य आजारांचा धोका वाढू शकतो. कचऱ्यामुळे रानडुक्कर, अस्वलांसह अन्य वन्यप्राणी आकर्षित झाल्यास लगतच्या शेतांमध्ये काम करणारे शेतकरी व शेतमजूर यांच्या जीवितालाही धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात आली. शेती, पिके, भूजल आणि सार्वजनिक आरोग्यावर होणाऱ्या संभाव्य परिणामांची जबाबदारी कोण घेणार, असा सवालही ग्रामस्थांनी प्रशासनाला विचारला आहे.
कचराडेपो तातडीने हटविण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना यापूर्वीच देण्यात आले आहे. मात्र ठोस कार्यवाही होत नसल्याने अखेर ग्रामस्थांना रस्त्यावर उतरावे लागले. सागवान ग्रामपंचायतच्या कचरागाड्या अडवून त्यांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला “आमच्या संमतीशिवाय माळविहीरच्या भूमीवर कचऱ्याचा डोंगर उभा राहू देणार नाही!”
बुलढाण्यातील कचरा प्रकरण आता अक्षरशः पेटले असून माळविहीर ग्रामस्थांचा हा एल्गार प्रशासन मान्य करणार, की संघर्ष आणखी तीव्र होणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.











Total Users : 3339708