spot_img
spot_img

पिझ्झा-बर्गरच्या जमान्यात रानभाज्यांचा ‘तडका’! वरवट बकालच्या महाविद्यालयात सातपुड्याचा रानमेवा थेट विद्यार्थ्यांच्या ताटात!

वरवट बकाल (हॅलो बुलढाणा/ज्ञानदेव राजनकर) आधुनिक जीवनशैलीच्या नादात विस्मृतीत चाललेल्या पौष्टिक रानभाज्यांचे महत्त्व नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी सातपुडा शिक्षण संस्थेद्वारा संचालित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात शुक्रवारी, २१ ऑगस्ट रोजी रानभाजी महोत्सव उत्साहात पार पडला. वनस्पतिशास्त्र विभागाने आयोजित केलेल्या या महोत्सवाचे उद्घाटन संस्थेच्या कोषाध्यक्ष डॉ. स्वाती संदीप वाकेकर यांच्या हस्ते झाले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य श्रीराम येरणकर होते. परीक्षक म्हणून डॉ. राजेंद्र कोरडे, डॉ. मेघा सोळंके, डॉ. सुरेश भालतडक यांच्यासह संतोष म्हसाळ, साबळे, मोरे व शेरकर उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी जंगल आणि परिसरातून रानभाज्या गोळा करून केना, आघाड्याची भाजी, मोहाची पुरणपोळी, शेवग्याची पुरी, भादली भात, गुळवेलीची चटणी, करडूची भाजी, रानभेंडी पुरी, फाजीची भाजी आणि बांबूच्या कोंबांची भाजी असे अस्सल पारंपरिक पदार्थ तयार केले. मान्यवरांनी पदार्थांचा आस्वाद घेत विद्यार्थ्यांकडून त्यांच्या पौष्टिक व औषधी गुणधर्मांची माहिती जाणून घेतली.

‘रानभाजी खा, आरोग्य जपा आणि निसर्गाशी नाते जोडा’ हा दमदार संदेश महोत्सवातून देण्यात आला. उत्कृष्ट पदार्थ सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. सूत्रसंचालन कल्याणी हागे यांनी, तर आभारप्रदर्शन साक्षी इंगळे यांनी केले.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!