spot_img
spot_img

‘कर्ज भरला, हाच आमचा गुन्हा का?’ तुपकरांचा सरकारला सवाल; २७ ऑगस्टला मंत्र्यांच्या बंगले-गाड्यांचा ‘लिलाव’! नियमित कर्जदारांना २ लाखांचे अनुदान द्या; ITR, पुनर्गठित व जुन्या कर्जमाफीतील वंचित शेतकऱ्यांनाही लाभ देण्याची मागणी

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) शेतकरी कर्जमाफीतील त्रुटींवरून शेतकरी नेते तथा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी पुन्हा एकदा सरकारविरोधात एल्गार पुकारला आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांवर पुढील सात दिवसांत सकारात्मक निर्णय न झाल्यास २७ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता मुंबईत मंत्र्यांचे बंगले आणि शासकीय वाहने जप्त करून त्यांचा प्रतिकात्मक जाहीर लिलाव करू, असा आक्रमक इशारा त्यांनी दिला आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेत थकीत कर्जदारांना दिलासा मिळत असताना नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना केवळ ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देणे अन्यायकारक असल्याचे तुपकरांनी म्हटले आहे. “नियमित कर्ज भरून आम्ही गुन्हा केला का?” असा सवाल करत नियमित कर्जदारांना दोन लाख रुपये प्रोत्साहन अनुदान देण्याची मागणी त्यांनी केली.

आयटीआर भरणारे शेतकरी, बँकांनी कर्जाचे पुनर्गठन केल्याने योजनेबाहेर राहिलेले खातेदार तसेच २०१७ आणि २०१९ मधील कर्जमाफीपासून वंचित पात्र शेतकऱ्यांना नव्या योजनेत सामावून घ्यावे. पात्र मयत शेतकऱ्यांच्या कायदेशीर वारसांनाही कर्जमाफीचा लाभ द्यावा, अशी भूमिका तुपकरांनी मांडली आहे.

ओटीएस प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांचा सिबिल स्कोअर खराब झाल्यास भविष्यात त्यांना गृहकर्ज, व्यवसाय कर्ज अथवा पीककर्ज मिळण्यात अडचणी येऊ शकतात. त्यामुळे सरकारने रिझर्व्ह बँकेशी चर्चा करून शेतकऱ्यांच्या आर्थिक पतसंरक्षणाची हमी द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.

“सरकारकडे शेतकऱ्यांसाठी पैसे नसतील, तर मंत्र्यांचे बंगले आणि गाड्या विकून कर्जमाफी करा,” असा घणाघात तुपकरांनी केला. आता सरकार झुकणार की २७ ऑगस्टला मुंबईत शेतकऱ्यांचा ‘लिलाव एल्गार’ धडकणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!