मेहकर (हॅलो बुलढाणा) बातम्यांचा दमदार पाठपुरावा केला तर प्रशासनही हादरून जाते आणि यंत्रणा दखल घेण्यासाठी झुकतेच! ‘हॅलो बुलढाणा’ने मेहकर येथील शाळेच्या भूखंडाच्या आरक्षित प्रकरणाचा पाठपुरावा केला होता त्याची दखल जिल्हाधिकाऱ्यांकडून घेण्यात आली आहे.
मेहकर भाग-१ येथील सर्वे क्र. १६/२ मधील प्राथमिक शाळेसाठी आरक्षित जमिनीच्या कथित नियमबाह्य खरेदी-विक्री, फेरफार नोंदी तसेच संबंधित अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेच्या तक्रारीची जिल्हाधिकारी कार्यालयाने गंभीर दखल घेतली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार या प्रकरणाच्या चौकशीबाबत अपर जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्याचे लेखी पत्र तहसीलदार वृषाली केसकर यांनी तक्रारदारांना दिले आहे. मेहकर येथील शेख सादिक शेख हारून बागवान, शेख हमीद शेख अफसर आणि अशफाक शहा यांनी दि. २१ जुलै २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रार केली होती. सर्वे क्र. १६/२ मधील प्राथमिक शाळेसाठी आरक्षित जमिनीबाबत ७/१२ उतारे, शोध अहवाल, फेरफार नोंदी, खरेदीखत व इतर कागदपत्रांच्या आधारे नियमबाह्य व्यवहार झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला होता.या प्रकरणात मेहकर नगर परिषद, नगररचना विभाग, तहसील कार्यालय, दुय्यम निबंधक कार्यालय तसेच इतर संबंधित कार्यालयांकडे वेळोवेळी तक्रारी व निवेदने देऊनही अपेक्षित कार्यवाही झाली नसल्याचे तक्रारदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निदर्शनास आणून दिले होते. कारवाई न झाल्यास ११ ऑगस्ट २०२६ पासून जिल्हाधिकारी कार्यालय, बुलढाणा येथे आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला होता.विशेष म्हणजे ‘हॅलो बुलढाणा’ने यासंदर्भातील बातम्याचा पाठपुरावा केला होता. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून या प्रकरणाची चौकशी करण्याबाबत अपर जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्याचे लेखी आश्वासन तक्रारदारांना मिळाल्यानंतर त्यांनी आमरण उपोषण काही दिवसांसाठी स्थगित केले आहे. प्रशासनाने चौकशीची प्रक्रिया सुरू करण्याचे आश्वासन दिल्याने तक्रारदारांनी आंदोलनाला तात्पुरती स्थगिती दिली आहे.
▪️पालिकेचा अहवाल!
याच प्रकरणात मेहकर नगर परिषदेने सादर केलेल्या अहवालात सर्वे क्र. १६/२ मधील ३,२१४.५९ चौ.मी. क्षेत्र प्राथमिक शाळेसाठी सुविधा क्षेत्र आरक्षित म्हणून राखीव असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच या जागेचा वापर आरक्षित प्रयोजनासाठीच करणे बंधनकारक असल्याचे अहवालात नमूद आहे.आता जिल्हास्तरीय चौकशीत या आरक्षित भूखंडाच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार, फेरफार नोंदी, संबंधित कागदपत्रे आणि अधिकाऱ्यांची भूमिका यांची तपासणी होणार आहे. त्यामुळे चौकशीचा अहवाल काय येतो आणि दोषी आढळणाऱ्यांवर कोणती कारवाई होते, याकडे मेहकरवासीयांचे लक्ष लागले आहे.










Total Users : 3277531