मेहकर (हॅलो बुलढाणा/अविनाश लाड) पंढरपूर येथून श्री संत गजानन महाराज पालखी परतीच्या वाटेवर असून, बुलढाणा जिल्ह्यात पालखीचे आगमन झाले आहे.दरम्यान १४ ऑगस्ट रोजी पालखी मेहकरला मुक्कामी येणार असून पालखी मार्गातील वाहतूक एका दिवसासाठी वळविण्यात आल्याची माहिती ठाणेदार आलेवार यांनी दिली आहे.
श्री संत गजानन महाराजांची पालखी पंढरपूर येथून शेगावकडे परतीच्या प्रवासाला निघाली असून, सिंदखेड राजा मार्गे मातृतीर्थ बुलडाणा जिल्ह्यात पालखीचे आगमन झालेले आहे.श्री संत गजानन महाराजांची पालखी १४ ऑगस्ट रोजी लोणार येथून सुलतानपूर मार्गे रात्री शारंगधर बालाजी नगरी मेहकर येथे मुक्कामी येणार असून सदर पालखीच्या दर्शनासाठी मेहकर पंचक्रोशीतील हजारो भाविक भक्त मेहकर येथे येत असतात. त्यामुळे कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये म्हणून बुलडाणा जिल्हाधिकारी यांनी वाहतुकीच्या सुनियमनासाठी पालखी मार्गावरील मेहकर शहरातील वाहतूक १४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता पासून १५ ऑगस्ट च्या सकाळी १०:०० वाजेपर्यंत वळविण्यासाठी एस टी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना व ट्राफिक पोलीस अधिकाऱ्यांना सुचना दिल्या आहेत. सिंदखेड राजा कडून सुलतानपूर मार्गे मेहकर शहराकडे येणाऱ्या सगळ्या बसेस सिंदखेड राजा-देऊळगाव राजा तसेच चिखली-अमडापूर मार्गे तर चिखली लव्हाळा मार्गे मेहकर कडे येणारी वाहतूक चिखली लव्हाळा अमडापूर मार्गे व वाशीम, मालेगाव, डोणगाव, मेहकर मार्गे सुलतानपूरकडे जाणारी वाहतूक खंडाळा बायपास, सोनाटी बायपास, लोणार फाटा मार्गे चिखली आणि जानेफळ कडून मेहकरकडे येणारी वाहतूक जानेफळ रोड, डोणगाव रोड, डी. पी. रोड मार्गे बसस्टँड मेहकर कडे वळविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी बुलडाणा यांच्या आदेशानुसार मेहकर पोलीस स्टेशनचे ठाणेदार आलेवार यांनी दिली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १३१ नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल तरी याबाबत खाजगी वाहन मालक आणि प्रवाशांनी नोंद घेऊन गैरसोय टाळावी, असे आवाहन ठाणेदार आलेवार यांनी केले आहे.










Total Users : 3277238