spot_img
spot_img

‘सरपटणाऱ्या मृत्यूला’ बरणीबंद करणाऱ्या सर्पमित्रांची ‘फरपट’ कायम! वन विभाग काही सुविधा पुरविणार की नाहीत? सर्पमित्र श्रीराम रसाळ यांचा सवाल!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) ‘सरपटणाऱ्या मृत्यूला’ अर्थात विषारी सापांना जीवाची बाजी लावून सुरक्षित पकडणे व त्यांना निसर्गाच्या सानिध्यात सुखरूप सोडण्याचे काम सर्पमित्र करत असतात. परंतू मानवी वस्तीत घुसलेल्या सापांना सुरक्षितपणे पकडून त्यांचे व नागरिकांचे प्राण वाचवण्याचे अत्यंत जोखमीचे काम करणारे हे सर्पमित्र योग्य शासकीय सहकार्य, ओळख आणि आर्थिक सुरक्षेअभावी उपेक्षेचा सामना करत असल्याची खंत वन्यजीव संरक्षण व निसर्ग पर्यावरण संस्थेचे अध्यक्ष श्रीराम रसाळ यांनी ‘हॅलो बुलढाणा’ कडे व्यक्त केली आहे. १७ ऑगस्टला नागपंचमीनिमित्त कृतज्ञता म्हणून सरपटणाऱ्या नागांचे पूजन होणार मात्र सर्पमित्रांची फरपट कधी थांबणार? हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झालाय.

बुलढाणा जिल्ह्यासह विदर्भात मोठ्या प्रमाणात सर्पमित्र आहेत. वेळोवेळी त्यांना नागरिकांकडून साप पकडण्यासाठी त्यांची मोबाईलची टोन खणखणत असते. सर्पमित्र तेथे धावून जातात आणि जीव धोक्यात टाकून वन्यजीवाला पकडून नागरिकांची भीती दूर करतात. येथील सर्पमित्र श्रीराम रसाळ अनेक वर्षापासून सर्प व वन्यजीव रक्षणाचे अविरत काम करीत असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक सर्पमित्र प्रशिक्षित झाले तर त्यांच्या अभ्यासपूर्ण कार्यक्रमातून सर्प रक्षणाचा जागर केला जातोय.

सर्पसंरक्षण, मानवी दक्षता आणि सर्पमित्रांचे योगदान
​भारतीय संस्कृतीत निसर्ग आणि प्राण्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची एक सुंदर परंपरा आहे. याच परंपरेतील एक अत्यंत महत्त्वाचा सण म्हणजे ‘नागपंचमी!’ श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पंचमीला हा सण साजरा केला जातो. नागपंचमी हा केवळ धार्मिक विधींचा सण नसून तो निसर्गातील अन्नसाखळी जपणाऱ्या आणि शेतकऱ्याचा खरा मित्र असलेल्या ‘सापांविषयी’ कृतज्ञता बाळगण्याचा आणि त्यांच्या संरक्षणाचा संदेश देणारा दिवस आहे. परंतु शासनाने व समाजाने देखील जीव धोक्यात घालून वन्यजीवांची रक्षा करणाऱ्या सर्पमित्रांंबद्दल आस्था ठेवणे व त्यांना सुविधा देणे आवश्यक असल्याचे मत सर्पमित्र एसबी रसाळ यांनी व्यक्त केले. दरम्यान १७ ऑगस्टला नागपंचमीचा सण साजरा होईल. मात्र नागपंचमीचा खरा अर्थ सापांची पूजा करून त्यांना दूध पाजणे हा नसून, सापांचे निसर्गातील स्थान समजून घेऊन त्यांचे रक्षण करणे हा आहे. पावसाळ्यात योग्य ती दक्षता बाळगून आणि सर्पमित्रांच्या कार्याला योग्य सन्मान व सुविधा देऊन मानवी जीवन आणि वन्यजीव दोन्ही सुरक्षित करू शकतो. या नागपंचमीला सापांविषयीच्या अंधश्रद्धा दूर सारून ‘सर्पसंरक्षणाचा’ संकल्प करूया! असे आवाहन सर्पमित्र एस बी रसाळ यांनी केले आहे.

▪️शासनाने व वनविभागाने सुविधा द्याव्या!

सर्पमित्रांना दर्जेदार ‘स्नेक हुक’ , स्नेक बॅग, टोंग्स, सुरक्षित बूट आणि जाड हातमोजे उपलब्ध करून दिले पाहिजेत. सर्पमित्रांच्या कामात मोठा धोका असतो. त्यामुळे शासनाने किंवा स्थानिक संस्थांनी त्यांचा ‘अपघात व जीवन विमा’ काढणे आवश्यक आहे. वनविभागाने प्रशिक्षित सर्पमित्रांना अधिकृत ओळखपत्रे द्यावीत आणि वेळोवेळी अद्ययावत प्रशिक्षणाचे आयोजन करावे.साप पकडण्यासाठी जाण्या-येण्याचा खर्च किंवा दुर्दैवाने सर्पदंश झाल्यास सर्पमित्राला मोफत आणि प्राधान्याने वैद्यकीय उपचार मिळण्याची सोय असावी, अशा मागण्यांची शासनाने पूर्तता करावी,असे रसाळ यांनी म्हटले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!