spot_img
spot_img

BREAKING! नांदुऱ्यातील काटी गावात मध्यरात्री सशस्त्र दरोडेखोरांचा धुमाकूळ; चोरट्याला पकडण्यासाठी धावलेल्या रायसिंग सोळंके यांच्यावर चाकूचे वार… रक्ताच्या थारोळ्यात मृत्यू, मारेकरी अंधारात पसार!

नांदुरा (हॅलो बुलढाणा) नांदुरा तालुक्यातील काटी गावात मध्यरात्री सशस्त्र दरोडेखोरांनी अक्षरशः धुमाकूळ घातला. चोरीचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी धाडसाने पुढे सरसावलेल्या रायसिंग सिताराम सोळंके (वय ५०) यांच्यावर दरोडेखोराने चाकूने जीवघेणा हल्ला केला. गंभीर जखमी झालेल्या सोळंके यांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसर हादरला आहे.

प्राप्त माहितीनुसार, रात्री १ ते २ वाजेदरम्यान तीन ते चार सशस्त्र दरोडेखोर काटी गावात शिरले. त्यांनी एका साडीच्या गोडाऊनसह दोन बंद घरांची कुलपे तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला. यापैकी एका घरासमोर सोळंके यांचा गुरांचा गोठा आहे. रात्री गोठ्याकडे आलेल्या सोळंके यांना घरासमोर संशयित व्यक्ती दिसल्या. त्यांनी प्रसंगावधान राखत एका दरोडेखोराला पकडण्याचा प्रयत्न केला; मात्र त्याचवेळी दुसऱ्या दरोडेखोराने त्यांच्यावर चाकूने वार केले.

रक्तबंबाळ अवस्थेतही सोळंके यांनी आरडाओरड केल्याने दरोडेखोर अंधाराचा फायदा घेत पसार झाले. घटनेची माहिती मिळताच मलकापूर ग्रामीण पोलिसांचे पथक गावात दाखल झाले. दरोडेखोरांच्या शोधासाठी पोलिसांनी तपासचक्रे वेगाने फिरवली आहेत. मात्र, या निर्घृण घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापासह दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!