चिखली (हॅलो बुलढाणा/ सय्यद साहिल) जयस्तंभ चौकातील ‘भवानी बीकानेर’मध्ये कथित बुरशीयुक्त केक विक्रीचे प्रकरण आता केवळ केकपुरते मर्यादित राहिलेले नाही. गुलाबजामुनच्या गुणवत्तेबाबतही स्वतंत्र तक्रार प्राप्त झाल्याने अन्न व औषध प्रशासनाने दुकानासह गोडाऊनची तपासणी करून प्राथमिक नोटीस बजावली आहे. केकपाठोपाठ गुलाबजामुनचेही नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आल्याने या प्रकरणाने गंभीर वळण घेतले आहे.
बुलढाणा जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष सहआयुक्त प्रमोद पाटील यांच्या आदेशानुसार अन्न सुरक्षा अधिकारी अक्षय भोपळे यांनी दुकान आणि गोडाऊनची तपासणी केली. यावेळी संबंधित अन्नपदार्थांचे नमुने घेण्यात आले. त्यांची प्रयोगशाळेत तपासणी झाल्यानंतरच पदार्थ सुरक्षित होते की नियमबाह्य, हे स्पष्ट होणार आहे.
कालपर्यंत चर्चा कथित बुरशीयुक्त केकभोवती केंद्रित होती. मात्र, गुलाबजामुनबाबतही प्रशासनाकडे तक्रार पोहोचल्याने दुकानातील मिठाईची निर्मिती, साठवणूक, स्वच्छता आणि गुणवत्ता नियंत्रणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, गुलाबजामुन दुकानातच तयार होत असल्याचे सांगितले जात असल्याने प्रशासनाच्या तपासणीकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे.
तक्रार असलेला केक बाहेरील पुरवठादाराकडून आल्याचा दावा दुकानदाराने केला आहे. संबंधित पुरवठादाराकडून माल खरेदी करणे आता बंद केल्याचेही दुकानाकडून सांगण्यात आले. प्रशासन संबंधित पुरवठादाराची चौकशी करून त्यालाही नियमानुसार नोटीस बजावण्याची प्रक्रिया करणार असल्याची माहिती आहे.
आता सर्वकाही प्रयोगशाळेच्या अहवालावर अवलंबून आहे. नमुने असुरक्षित किंवा निकृष्ट आढळल्यास संबंधितांवर अन्नसुरक्षा कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले. एकीकडे केकचा पुरवठादार तपासाच्या फेऱ्यात, तर दुसरीकडे गुलाबजामुनमुळे दुकानाची अंतर्गत व्यवस्था संशयाच्या भोवऱ्यात आता अहवालात नेमके काय उघड होणार, याकडे चिखलीकरांचे लक्ष लागले आहे.










Total Users : 3253064