खामगाव (हॅलो बुलढाणा) तालुक्यात राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवणारी कारवाई समोर आली आहे. माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेना गटाचे खामगाव तालुकाध्यक्ष राजू बघे यांच्या कथित जुगार अड्ड्यावर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या पथकाने धाड टाकल्याची माहिती पोलिसांच्या नोंदीतून समोर आली आहे. या कारवाईत तब्बल ₹८ लाख ४३ हजार ८६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, १३ जणांविरुद्ध खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजू बघे हे मात्र पोलिसांची चाहूल लागताच फरार झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
शेलोडी शिवारातील एका शेतामध्ये असलेल्या टीनशेडमध्ये मोठ्या प्रमाणावर जुगार सुरू असल्याची माहिती ‘डीवायएसपी’ पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने अचानक छापा टाकला असता, आरोपी ‘एक्का-बादशहा’ नावाचा जुगार खेळताना आढळल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
या कारवाईत संजय शेगोकार, सुनील भोजने, शुभम भोजने, अमोल मुंडाले, सचिन मोहाडे, प्रभाकर तायडे, नंदकिशोर आरे, नासिर खाँ, आकाश हांडे, निवृत्ती हिंगणे, शेख राजीक आणि विनोद जाधव या १२ जणांना पोलिसांनी पकडले. तर प्रकरणातील तेरावा आरोपी म्हणून नाव असलेले राजू बघे, रा. पिंप्री गवळी, हे घटनास्थळावरून फरार झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
पोलीस हेडकॉन्स्टेबल योगेश काशिनाथ कुवारे यांच्या लेखी फिर्यादीवरून सर्व १३ आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल किरण राऊत करीत आहेत.
सत्ताधारी पक्षाच्या तालुकाध्यक्षाचे नाव जुगार प्रकरणात आल्यामुळे खामगावच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, या आरोपांबाबत राजू बघे अथवा शिवसेना शिंदे गटाची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही.










Total Users : 3251637