चिखली (हॅलो बुलढाणा/सय्यद साहिल) शहरातील जयस्तंभ चौकात असलेल्या ‘भवानी बीकानेर मिष्ठान्न भंडार’मधून कथितरीत्या सडलेला आणि बुरशीयुक्त केक विकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका ग्राहकाने ५ ऑगस्ट २०२६ रोजी संध्याकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास लहान मुलांसाठी अर्धा किलोचा केक खरेदी केला. मात्र, घरी नेऊन केक कापल्यानंतर त्याच्या आतील भागावर पांढऱ्या आणि काळ्या रंगाची बुरशी आढळल्याचा आरोप ग्राहकाने केला आहे.
विशेष म्हणजे, केक बाहेरून आकर्षक आणि व्यवस्थित दिसत असल्याने खराब असल्याचा संशय आला नाही. त्यामुळे घरातील काही मुलांनी केक खाल्ल्याचेही संबंधित पालकांचे म्हणणे आहे. त्यानंतर केकच्या आतील भागात बुरशी दिसताच कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
“आम्ही विश्वासाने मुलांसाठी केक घेतला होता. मात्र, तो कापल्यानंतर आत मोठ्या प्रमाणात बुरशी आढळली. मुलांनी केक खाल्ल्याने त्यांच्या आरोग्याला काही धोका निर्माण झाल्यास संबंधित दुकान आणि प्रशासन जबाबदार राहील,” असा संतप्त आरोप ग्राहकाने केला.
या प्रकारानंतर दुकानात विक्रीसाठी ठेवण्यात येणारे केक, मिठाई आणि इतर खाद्यपदार्थ किती दिवसांचे आहेत? त्यांची मुदत, साठवणूक आणि गुणवत्ता नियमितपणे तपासली जाते का? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
अन्न व औषध प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन दुकानातील खाद्यपदार्थांचे नमुने तपासावेत, दोष आढळल्यास कठोर कारवाई करावी आणि नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांचा परवाना रद्द करावा, अशी मागणी जोर धरत आहे.
दरम्यान, या गंभीर आरोपांबाबत ‘भवानी बीकानेर’ दुकान व्यवस्थापनाची अधिकृत बाजू समजू शकलेली नाही. त्यांची प्रतिक्रिया प्राप्त झाल्यास ती प्रसिद्ध करण्यात येईल.















Total Users : 3299097