देऊळगाव राजा (हॅलो बुलढाणा/संतोष जाधव) बकरीच्या नुकसानभरपाईच्या किरकोळ वादातून एका ५५ वर्षीय व्यक्तीच्या डोक्यात काठीने प्रहार करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना देऊळगाव राजा तालुक्यातील पाडळी शिंदे येथे उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली असून अंढेरा पोलिसांनी एका नामनिर्दिष्ट आरोपीसह त्याच्या अनोळखी साथीदाराविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
मच्छिंद्र ऊर्फ छगन तुकाराम मोरे (वय ५५, रा. पाडळी शिंदे) असे मृतकाचे नाव आहे. पोलिसांकडे दाखल तक्रारीनुसार, मृतकाने लावलेल्या विद्युत प्रवाहामुळे आरोपीची बकरी मृत्युमुखी पडली होती. त्या बकरीच्या नुकसानभरपाईचे पैसे आरोपी मृतकाकडे वारंवार मागत होता. याच जुन्या वादातून ४ ऑगस्टच्या रात्री ते ५ ऑगस्टच्या सकाळदरम्यान आरोपी आणि त्याच्या साथीदाराने मृतकाच्या डोक्यात काठीने जबर प्रहार करून त्याला ठार मारल्याचा आरोप आहे.
घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन ठोसरे आणि ठाणेदार रुपेश शक्करगे यांनी घटनास्थळी भेट दिली. फॉरेन्सिक टीम आणि श्वानपथकानेही तपास केला. घटनास्थळावरून काठी जप्त करण्यात आली असून अंढेरा पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१), ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार रुपेश शक्करगे करीत आहेत.










Total Users : 3231435