बुलढाणा (हॅलो बुलढाणा) सरस्वती नगर परिसरातून अवघ्या १४ वर्षे ५ महिन्यांचा विद्यार्थी अचानक बेपत्ता झाल्याने बुलढाणा शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. घरात कोणालाही काहीही न सांगता तो दहा हजार रुपये आणि शाळेची बॅग घेऊन निघून गेला. मात्र रात्री घरातील सोफ्यावर त्याची पुस्तके आढळली आणि त्यामध्ये सापडलेल्या हस्तलिखित चिठ्ठीने कुटुंबीयांच्या पायाखालची जमीनच सरकली!
बेपत्ता विद्यार्थी शहरातील एका नामांकित शाळेत नववीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. ४ ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजेपर्यंत तो घरात होता. सायंकाळी वडील नांदुरा येथील महाविद्यालयातून घरी परतल्यानंतर मुलगा दिसला नाही. सुरुवातीला तो खेळण्यासाठी बाहेर गेला असावा, असा कुटुंबीयांचा अंदाज होता. मात्र सायंकाळी सात वाजेपर्यंत तो परतला नाही.
नातेवाईक, मित्र आणि शहरातील विविध भागांत शोध घेऊनही त्याचा काहीच मागमूस लागला नाही. रात्री नऊच्या सुमारास घरी परतलेल्या कुटुंबीयांना सोफ्यावर पुस्तके दिसली; मात्र शाळेची बॅग गायब होती. पुस्तकांमध्ये मिळालेल्या चिठ्ठीत त्याने आई-वडिलांची माफी मागत, दहा हजार रुपये नेत असल्याचे आणि काही वर्षांनी परत येणार असल्याचे लिहिले आहे. “मला शोधू नका,” अशी विनंतीही त्याने केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
शहर पोलिसांनी तत्काळ CCTV फुटेज तपासले असता, सायंकाळी सुमारे ४.२८ वाजता त्रिशरण चौकातून मोठ्या देवीच्या दिशेने तो सायकलवर जाताना दिसून आला. अंगात काळा ड्रेस, लाल टोपीचा रेनकोट आणि काळी पँट होती.
याप्रकरणी बुलढाणा शहर पोलिसांनी बीएनएस कलम १३७(२) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून, पोलिसांची पथके विद्यार्थ्याच्या शोधासाठी रवाना झाली आहेत.










Total Users : 3234689