spot_img
spot_img

तडीपारीच्या नोटिसांनी ‘शेतकरी वादळ’ थांबणार नाही! आमदारांच्या दबावाखाली प्रशासन नाचले तर खुर्च्या उलथवू; हिंगोलीतून रविकांत तुपकरांचा भाजप आ. तानाजीराव मुटकुळेंना थेट इशारा!

हिंगोली (वृत्तसंस्था/हॅलो बुलढाणा) शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना तडीपारीच्या नोटिसा बजावून चळवळ मोडण्याचा प्रयत्न केला जात असेल, तर राज्यातील शेतकरी सत्ताधाऱ्यांच्या खुर्च्या उलथवून टाकतील, असा घणाघाती इशारा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी दिला.

हिंगोलीतील पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे यांच्यावरील तडीपारीच्या कारवाईवरून भाजप आमदार तानाजीराव मुटकुळे यांच्यावर थेट निशाणा साधला. कावरखे आणि नामदेव पतंगे यांना मिळणारे वाढते जनसमर्थन पाहून आमदारांच्या पायाखालची वाळू सरकल्याने प्रशासनावर दबाव टाकून कारवाई करण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.

“तडीपारी गुंडांसाठी असते, शेतकऱ्यांसाठी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी नाही. नोटिसा, दबाव आणि दडपशाहीला आम्ही घाबरणार नाही,” असे तुपकर ठणकावून म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात तातडीने लक्ष घालावे, अन्यथा त्याची जबाबदारी गृहखात्यावर राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कर्जमाफी योजनेतील ओटीएसमुळे शेतकऱ्यांचे सिबिल खराब होणार असल्याचा आरोप करत नियमित कर्जफेड करणाऱ्यांना दोन लाखांचे प्रोत्साहन अनुदान देण्याची मागणी त्यांनी केली. मागण्या मान्य न झाल्यास ऑगस्टमध्ये राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशाराही तुपकरांनी दिला.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!